Sunday 18 November 2018

अवनीच्या निमित्ताने


                          अवनीच्या निमित्ताने.....
दोन बाळांची आई असलेल्या अवनी या वाघिणीला नरभक्षक ठरवून मारण्यात आले. त्यासाठी तिने आसपासच्या मानवी वस्तीतील तेरा जणांचे प्राण घेतल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला व या तेरा जणांचे प्राण त्यासाठी समर्थन म्हणून वापरण्यात आले व जनतेची सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न झाला. येथपर्यंत हे जर खरे असते तर साऱ्या घटनाक्रमावर हरकत घेण्याचे काही कारण नव्हते. मात्र आता या प्रकरणाच्या चर्चेतून जी काही माहिती पुढे येते आहे ती या प्रकारातील खोटारडेपणाच सिध्द करीत असून अवनी व तिच्या दुधपित्या बाळांवर हा एकप्रकारे अन्यायच होणार असून ज्यां प्राण्यांना या विरोधात बोलण्याचा काही अधिकार वा क्षमता नसल्याने त्यांच्या बाजूने मात्र प्राणिमात्र संघटनाच नव्हे तर केंद्रिय मंत्री मनेका गांधीनी चौकशीची मागणी करत या घटनेतील अनेक गैरप्रकारांची उकल केली आहे.
यातील प्रमुख आक्षेप असा की काही उद्योगांना ही जमीन देण्यासाठी तिचे वनक्षेत्र हे स्टेटस नाहीसे करण्यासाठी त्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचे अस्तित्व नाहीसे करण्याचा भाग असल्याचा करण्यात येतो. या भागातील जमीनीत असलेले काही खनिजे काढण्यासाठी खोदकाम करणे आवश्यक असून त्यासाठी ते वनक्षेत्र नसल्याचे दाखवावे लागते. हाच प्रकार विदर्भातील अनेक खाणी उद्योगाबाबत झाला असून या भागातील वन्यक्षेत्राचा ऱ्हास होत त्यातील प्राणीमात्रांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. आपले अन्न, पाणी व निवारा शोधण्याच्या प्रयत्नात हे प्राणी कधीतरी तिथे नको असणाऱ्या मानवी वस्तीपर्यंत येऊन पोहचतात व त्यांची अन्नपाण्याची माफक अपेक्षा न समजून घेता मानव मात्र त्यांना शत्रु समजत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले चढवत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यातून या प्राण्यांच्या स्मृतीकोषात मानवी प्रतिमांबद्दल एक सूडात्मक भावना तयार होत आपल्या स्वसंरक्षणाचा एक भाग म्हणून हे प्राणी आपली भूमिका ठरवत असावेत.
एकादा प्राणी नरभक्षक ठरवणे हे त्याला मारण्याच्या दृष्टीने आवश्यक असावे असे एकंदरीत शिकाऱ्यांच्या दस्तऐवजात सापडते. नाहीतर एकाद्या प्राण्याला मानवाने का मारावे याला कुठलेही तर्कशास्त्रीय कारण नाही. अत्यंत अंधपणाने असे गैरसमज समाजात रुढ केले जातात. अगदी वाघ बिबटेच काय सिंहावरचे आजवरचे प्रसिध्द झालेले व्हिडिओ बघितले तर ते मानवाचे चांगले मित्र ठरू शकतात हे सिध्द होते. चाळीसगावला डॉ म्हसकर यांनी तर एक सिंहिण पाळली होती व कुठलाही पिंजरा न वापरता तिचा साऱ्या घरातून तिचा वावर असे. बाबा आमट्यांच्या आश्रमात अनेक हिंस्त्र प्राणी अगदी लहान मुलांवरोवर बगडतांना दिसतात. अफ्रिकेत एक सोळा वर्षांची मुलगी तिने पाळलेल्या बिबटया बरोबर मित्रासारखी रहात असल्याचे दाखवले जाते. काही प्रसंगात तर बिबट्याने तिच्या मानेभावती आपला जबडा आवळत आपल्या अंगावर शहारे येतील असे दाखवून सुध्दा त्या प्राण्याने तिला कुठलीही इजा केली नाही. आपल्या पाळीव व वन्य प्राण्यांनी एकमेकांच्या बछड्यांना दूध पाजण्याचे प्रकार तर ग्रामीण भागात सर्रास आढळतात.  असे प्राणी आपल्या अस्तित्वाबाबत मात्र सतर्क असतात व समोरच्या माणसाच्या मनात काय आहे हे ओळखण्याची त्यांची उपजत क्षमता असते. एका प्रसिध्द शिकाऱ्यांने लिहून ठेवले आहे की समोर जर वाघ आला तर घाबरून न जाता त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघा. तो काहीतरी निर्णय घेतो व काही न करता निघून जातो. असे हे प्राणीजगत चमत्कारानी भरलेले दिसते.
आता तर अवनीचे दोन्ही बछडे नरभक्षक ठरवले जात आहेत. वनाधिकारी वा शिकारी जाऊ द्या, ज्यांना प्राण्यांची थोडीफार माहिती आहे असे विधान करणार नाहीत. मुळात कुठलाही प्राणी हा चवीसाठी खात नाही तर भुकेसाठी खातो. त्यांच्या दातांची व तोंडाची रचना ही भक्ष्याचे तुकडे करण्यासाठी योजलेले असतात. जीभेपेक्षा त्यांचे घ्राणेंद्रिय शिकार शोधण्यास मदतीचे ठरते त्यामुळे भूक नसली तर प्राणी केवळ चवीसाठी दुसरी शिकार करीत नाहीत. हिंस्त्र प्राण्यांचे भूकेव्यतीरिक्त, विशेषत: मानवावरचे हल्ले हा त्यांच्या डीएनएत साठवलेल्या माहितीचा परिपाक असतो. भूक नसेल तर प्राणी काहीही दिले तर खात नाहीत. त्यामुळे वाघाचा माणसावरील हल्ला हा त्याच्या मांसाच्या चवीपोटी असतो हे विधान अज्ञानमूलक ठरते. आईच्या दूधावर असणाऱ्या बछड्यांची नरभक्षक होण्याची भिती ही गैरलागू ठरते. बऱ्याचदा प्राण्यांचे भक्ष्य हे चवीपेक्षा त्याच्या उपलब्धतेवर ठरते. चला आज माणूस खाऊ, कोंबडी खाऊ, ससा खाऊ असे कोणताही प्राणी ठरवत नाही.
मानव मात्र या वन्यप्राण्याच्या जीवावर उठलेला दिसतो. आपली जागा सोडून तो ज्यावेळी त्यांच्यावर अतिक्रमण करतो तेव्हा असे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आता या जंगलात एवढे वाघ असतांना साऱ्या मृत्युंचा आरोप अवनीवर, केवळ तिला मारण्याचे समर्थन मिळावे म्हणून केले जातात, कारण साऱ्या शवविच्छेदन अहवालात केवळ एका मृत्युच्या बाबतीत वाघाची लाळ मिळाली आहे. इतर मृत्युंचे कारण स्पष्ट झालेले नाही. मानवला स्वसंरक्षाणाचा अधिकार जरूर आहे परंतु तो अशा खोट्या कारणांसाठी वापरला गेला तर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारीही या वन्यप्राण्यांवर ढकलता येणार नाही.
                                                                              डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९

No comments:

Post a Comment