Saturday 13 October 2018

भाजपा विरोधाचे व्यवस्थापन


                                        भाजपा विरोधाचे व्यवस्थापन
येणाऱ्या लोकसभा वा विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यानुसार राजकीय वातावरण काय राहील याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे सत्ताधारी भाजपा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास ज्या अभिनिवेषाने जाहीर करतो आहे,  त्यामानाने विरोधी आघाडीत होणाऱ्या हालचाली एक सक्षम पर्याय देण्याच्या प्रयत्नात काहीशा मागे पडल्यासारख्या वाटतात. अर्थात त्याला तशी कारणेही आहेत. या भाजपा विरोधात ज्यांनी पुढाकार घेत साऱ्यांची मोट बांधायची तेही भांबावलेत की काय असे वाटू लागले आहे. तसा या भाजपा विरोधात ज्यांचा थोडाफार वाटा आहे असे वाटणारे अनेक छोटेमोठे पक्ष यात सामील व्हायला इच्छुक असूनही त्यांना गृहित घरत ऐनवेळी जे काही होईल ते बघू अशी रणनिती यामागे दिसते. शेवटी ही कोंडी फुटत नसल्याचे पाहून प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमशी एकत्र येत वंचितांची आघाडी स्थापन केल्याने किमान महाआघाडीची बोलणी तरी सुरु झाली. याचे मुख्य कारण असे आहे की या विरोधी आघाडीत सर्वांना जोडणारा भाजपा विरोध हा एक समान धागा असला तरी या साऱ्या पक्षांना वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या एकत्र येण्यात त्यांचा भूतकाळ ही डोकावत असतो व वर्तमानात त्यांची सत्तेची समीकरणे. अशा परिस्थितीत या साऱ्या परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करत आपल्याला नेमके काय उद्दिष्ट गाठायचे आहे हे ठरवणे महत्वाचे असतांना नेहमीच्याच झापडबंद पध्दतीने याची हाताळणी होते आहे.
दिवसेंदिवस घडणाऱ्या अनेक घटनांमुळे आजची राजकीय परिस्थिती अत्यंत दोलायमान होऊ लागली आहे. भाजपा विरोधाचे वास्तव प्रमाण लक्षात येणे तसे जिकीरिचे असले तरी हा सारा भाजपा विरोध निवडणुकीतून कसा प्रभावी ठरतो याच्या काही पूर्वअटी व पथ्ये आहेत. केवळ भाजपा विरोध आहे म्हणून मतदार केवळ आपल्यालाच मतदान करतील असे वाटणेही भाबडेपणाचे ठरू शकेल. या विरोधाचे विभाजन ही भाजपाची मुख्य रणनिती असेल व त्याला ही सध्याची भाजपा विरोधी आघाडी कितपत यशस्वीपणे हाताळते यावर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. वास्तवात भाजपाच्या विरोधाचे नीट विश्लेषण केले तर आज यात दोन प्रवाह दिसतात. एक प्रवाह बेगडी विरोध करणारा असून परिस्थितीजन्य लाभाचा सहभागी होऊ पहातो तर खऱ्या सैध्दांतिक पातळीवर भाजपा विरोध करणारे केवळ माध्यमांच्या खोडसाळपणामुळे जनमानसात येऊ दिले जात नाहीत. या बेगडी विरोधाच्या प्रवर्तकांनी महाराष्ट्रातील सत्तेत राहून व दुसऱ्याने बाहेरून पाठिंबा देत आपली राजकीय भूमिका काही प्रमाणात जाहीर केली आहे. .
या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांनी छेद देत खरा भाजपा विरोध कुठे आहे हे काही प्रमाणात दाखवले असले तरी अजूनही भाजपाला नेस्तनामूद करू शकेल अशी सक्षम आघाडी देण्यात अजून बराच अवकाश आहे. या निमित्ताने सामाजिक वंचितांचा एक घटक अधोरेखित झाला असला तरी भाजपाच्या आर्थिक धोरणांमुळे लाभक्षेत्राच्या बाहेर गेलेला आर्थिक वंचितांचा एक मोठा वर्ग भाजपा विरोधात असून देखील त्याची दखल कुणी घ्यायला तयार नाही. यात शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारी, सेवेकरी, व्यावसाईक, स्वयंरोजगारी, विद्यार्थी, महिला, युवक, असे अनेक समाज घटक येऊ शकतात. आज सामाजिक वंचितांचा ज्या प्राधान्याने विचार करायला भाग पाडले जात आहे त्यामानाने या आर्थिक वंचितांची कुठे दखल घेतली जात असल्याचे दिसत नाही. एकंदरीत एक भाजपा विरोध प्रस्थापित राजकारणाचा एक भाग म्हणून सत्ताकारणाशी निगडीत असल्याचे दिसते तर  ज्यांचा भाजपा विरोध हा केवळ विरोधासाठी नसून देशातील लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवण्याशी असा मूल्याधारित  आहे असे दोन प्रवाह दिसून येतील.  
निवडणुकीत मतदार काही उद्दिष्ट मनात ठेऊन मतदान करीत असतो. निवडणुकीत कुणाला निवडून देणार हे ध्येय असले तरी बऱ्याचदा त्याचे ध्येय कोण नको हेही असल्याचे दिसते. पर्याय निवडतांना तो आपले ध्येय निश्चित करण्याच्या दृष्टीने समोरचा किती सक्षम आहे हेही बघणार आहे. त्यामुळे खऱ्या भाजपा विरोधकांना आपली सक्षमता सिध्द करणे हे अनिवार्य ठरणार आहे. भाजपाने केलेल्या चूकांबरोबर निवडणुकीतील नवे मुद्दे काय असावेत हेही ठरवावे लागेल. नेहमीप्रमाणे महागाई वा बेरोजगारी सारखे मुद्दे असले तरी प्रत्यक्षात मात्र इंधन दरवाढीच्या विरोधात सामान्यांनी स्विकारलेले कठोर वास्तव व बेरोजगारी विरोधात तरूणांमध्ये उमटणारी प्रतिक्रिया यांचा सुप्त परिणाम बघावा लागेल. भ्रष्टाचाराचा मुद्दाही मतदारांच्या दृष्टीने फारसा परिणामकारक राहिलेला नाही, त्याहीपेक्षा गंभीर असे सर्व नागरिकांना समान हक्क व आधिकार देणाऱ्या संविधानाचे संरक्षण, देशाची सार्वभौमिकता व नागरिकांना झुंड वा कळप बनवण्याऐवजी लोकशाहीतील एक जबाबदार सहभागी नागरिक बनवण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्याची मुभा, समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा निर्माण करणारी धोरणे व त्यांच्यात द्वेषमूलक समजांची पेरणी टाळत सांमजस्याची निश्चिती, देशातील उत्पादन, व्यापार, सेवा देणारे शेतकरी, शेतमजूर, स्वयंरोजगारी, संघटित-असंघटित कामगार, महिला, तरूण यांना देशातील संसाधनांचा प्रत्यक्ष लाभ देत त्यांचे भवितव्य निश्चित करणारी धोरणे निश्चित करावीत. याच बरोबर देशातील कायदा व सुव्यवस्थेची घसरलेली प्रत सुधारणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने क्रियाशील प्रशासन आदि बाबींचा समावेश करता येईल. मात्र काही सामाजिक समीकरणे सोडता सध्याच्या भाजपा विरोधात या दिशेने मांडणी होतांना दिसत नाही.
सध्याचा भाजपा विरोध विभागण्यात भाजपा यशस्वी झाली तर मग भाजपाच्या विरोधकांना महत्प्रयासाने आलेली संधी गमावण्याचे दुःख सोसावे लागेल. त्यामुळे भाजपा विरोधाचे व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने करावे लागेल. यात प्रस्थापित राजकीय पक्ष सध्याच्या भाजपा विरोधावर निर्भर असल्याचे दाखवत असले तरी कदाचित पुढे मागे भाजपाशी जमवून घेतील कारण तसे भूतकाळातही अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे ज्यांचा खरा भाजपा विरोध मूल्याधारित आहे ते अशी तडजोड कितपत करू शकतील हा खरा प्रश्न असल्याने ते खरे बाधार्थी ठरतील. समजा या भाजपा विरोधात भाजपा विरोधकांची यशस्वी एकी होऊ शकली नाही तरी तात्विक विरोध हा मतदारांपुढे नेत मतदारांना खरा पर्याय कुठला आहे हे पटवून द्यावे लागेल. आज सारा भाजपा विरोध एका दृष्टीने आशादायक स्वरुपात दिसत असला तरी भाजपा विरोधकांमधील विस्कळीतपणा लक्षात घेता दैव देते पण कर्म नेते असे झाल्यास आश्चर्य वाटू नये.
                                                                                                                               डॉ. गिरधर पाटील. ९४२२२६३६८९.


1 comment: