Saturday 19 December 2015

बदलती शेती – न बदलणारी मनं !!



          बदलती शेती – न बदलणारी मनं !!
          शेतीतील वाढत्या जाणा-या समस्या हे आपल्यापुढील एक मोठे आव्हान असतानांच त्यावरील उपाययोजनांबाबतही सा-यांचा कमालीचा गोंधळ उडालेला दिसतो. सरकारच्या आकलन व अंमलबजावणीबद्दल आक्षेप असणे स्वाभाविक असले तरी शेतक-याला इतर माध्यमातून दिले जाणारे अनाहूत सल्ले व सुचवलेल्या उपाययोजना बघितल्या तर अधिकच गोंधळल्यासारखे होते. खुद्द शेतक-यांना आपल्याला काय हवे याबाबत अनुदानापासून कर्जमाफीपर्यंतच्या वरवर आकर्षक वाटणा-या मागण्यांबाबत मतभिन्नता असली तरी ती शेतीच्या एकंदरीत आकलनाबाबत शंका निर्माण करणारी ठरते. आपल्या बहुपेडी शेतीतील समस्याही बहुपेडी असणार यात शंका नाही मात्र उपाययोजना करतांना निश्चित करावयाचे बदल हे किमान मुद्यांबाबत सहमती दाखवत शेतक-याच्या आताच्या गंभीर परिस्थितीत तातडीने परिणामकारक बदल करणारे असावेत हे कुणीही अमान्य करणार नाही.
          शेतीप्रश्नांच्या आकलनाच्या सर्वात जवळ जाणारी व परिणामकारक ठरू शकणारी मांडणी ही शेतकरी संघटनेने उत्पादन खर्चावर भाव ही दिसते. देशातील शेतीच नव्हे तर सा-या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी व गरिबी निर्मूलन वा ग्रामीण स्थलांतर रोखून शहरांचे बकालीकरण रोखणारी ही मांडणी आहे. आज बदलत्या वातावरणात खुल्या व्यवस्थेत शेतमालाला बाजारातील मिळणारा भाव व त्यातील नफा शेतक-यांना मिळू द्यावा ही मागणी अजूनही बंदिस्त असणा-या शेतमाल बाजारावर करता येऊ शकते. मुळात आजवर ही मांडणी अजून कोणाला खोडून काढता आली नाही, एवढेच नव्हे तर अनेक पक्षांनी निवडणुका जिकण्यासाठी या मागणीचा गैरवापर करत शेतक-यांना भुलवत ठेवल्याचे दिसते. आज ही सारी व्यवस्था नियंत्रित करणा-यांना ही मांडणी अडचणीची ठरत असल्याने प्रत्यक्षात मात्र ती स्वीकारली जात नसल्याचा निष्कर्ष मात्र यातून काढता येतो.
          आज प्रामुख्याने शेतीचे प्रश्न हे उत्पादनाच्या पातळीवर ठेवले जातात. त्यात जमीन, तिचा आकार व पोत, पाऊसमान, सिंचनाच्या उपलब्धता, बिबीयाणी वा किटकनाशके अशा निविष्ठांशी जोडत योजना केल्या जातात. शेतीच्या भांडवल, पतपुरवठा, कर्ज आदि बाबींचाही समावेश केला जातो. मात्र शेतीतील उत्पादनाचे भांडवलात रुपांतर होतांना त्यातील नफा हिरावून घेणा-या शेतमाल बाजाराबाबत फारसे बोलले जात नाही. आज बंदिस्त असणारा हा शेतमाल बाजार अजूनही उपाययोजनांच्या रडारवर आलेला नाही वा येऊ दिलेला नाही. शेतक-यांनी चाळीस रूपयांनी विकलेली तूर बाजारात दिडशे रूपयांनी विकली जाऊ शकते असे विरोधाभासी चित्र अशा व्यवस्थेत दिसते. हंगामात सातशे ते हजारच्या भावाने कांदा खरेदी करत साठेबाजी करून ऐंशी रुपयांनी विकता येतो हेही याच व्यवस्थेत शक्य होते. अशी ही शेतमाल विक्री व्यवस्था उत्पादक शेतकरी व उपभोक्ता ग्राहक यांच्यासाठी न्याय्य ठरावी याच्या सुधाराचा कार्यक्रम ना तर केंद्राच्या अजेंड्यावर आहे ना तर राज्याच्या. याशिवाय शेतमालावरील प्रक्रिया उद्योग, आयात निर्यातीची धोरणे याबाबत निश्चित असा कार्यक्रम आखून त्यावर काही सकारात्मक होत असल्याचे दिसत नाही. एकंदरीत शेतीच्या प्रश्नांचे राजयिकीकरण व त्यावर प्रशासकीय अंमलबजावणीचा साज चढवत शेतक-यांसाठी आम्ही काहीतरी भव्यदिव्य करीत आहोत हे दाखवणे फारसे खरे नाही. आजवर या प्रारूपाचा शेतीच्या प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काहीएक उपयोग झालेला नाही व शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्याही कमी न होता वाढतच चालल्याचे दिसते.
या अर्थवादी काळात शेती हा केवळ पोट भरण्याचा धंदा राहिलेला नसून एक उद्योग म्हणून आकाराला येत असल्याने तिची सारी परिमाणे बदललेली दिसतील. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. प्रगती हो वा अधोगती, ती कुठल्याही बदलाशिवाय शक्य नाही. असे हे बदल न स्वीकारणा-यांना निसर्ग अव्हेरतो व कदाचित आपल्या नियमित वाटचालीतून बाजूलाही सारतो. अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. या सा-या बदलांना अगोदर वैचारिक पातळीवर समजून घ्यायची आवश्यकता असते व त्याला अनुरूप असणारी मानसिकताही जोपासावी लागते. जग बदलले, शेती बदलली तरी शेतकरी मात्र बदलला नाही. त्याची मानसिकता अर्थवादाला अनुरूप ठरण्याऐवजी जातपात, धर्म वा कर्मकांड यांच्याभोवतीच घुटमळत राहिल्याने तो अधिकच दैववादी होत गेल्याचे दिसते. उद्योग ही संकल्पना शास्त्रीय प्रमेयांवर आधारलेली असून भांडवल, नफातोटा व वाढ यांच्या संबंधीची एक वस्तुनिष्ठ, व्यावहारिक भूमिका असणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या विचार प्रक्रियेतूनच आपल्या समस्या सोडवण्याची सवय उद्योजकाला असावी लागते व त्या क्षमतेवरच तो आपल्या उद्योगाचे भवितव्य ठरवू शकतो. आजच्या शेतक-यांमध्ये आवश्यक असणारी व्यावहारिकता व वस्तुनिष्ठता त्याच्या विचारात व म्हणून निर्णयात व आचरणात दिसत नाही. जातीधर्म व कर्मकांडांचा प्रचंड प्रभाव असलेल्या या जनसमूहावर झालेले शतकोवर्षांचे संस्कार पुसणे फार महत्वाचे आहे.
एक चांगली गोष्ट की आपल्या शेतक-यांमध्ये उद्योजकता ठासून भरलेली असली तरी तिच्या असण्याचा फायदा त्याला काही होत नाही. त्याच्या उत्पादनातील नफ्याचा वाटा त्याच्यापर्यंत पोहचत नाही. तो का व कसा हा वेगळा प्रश्न असला तरी शेतक-यांना मदत करणा-या सरकार वा इतरांमध्ये हा प्रश्न कधी चर्चेला येऊ दिला जात नाही. हा डाव शेतक-यांच्या लक्षात येत नाही. कारण त्याला इतक्या वस्तुनिष्ठतेने विचार करण्याची सवय नाही. कोणी काही सांगितले की त्याच्यावर तो आंधळेपणाने विश्वास टाकतो. याचाच गैरफायदा ही व्यवस्था घेत आल्याचे दिसते.
सुदैवाने शेतक-यांची नवी पिढी ही अधिक जागरूक व प्रश्नांच्या मुळाशी जाणारी आहे. उद्योगाला आवश्यक असणारी वस्तुनिष्ठता, व्यावहारिकता व एकंदरीतच वैचारिक स्पष्टता या पिढीत दिसते. त्यांचा या सा-या संकट निवारणातील सहभाग देखील वाखाणण्यासारखा आहे. ठिकठिकाणचे तरूण शेतकरी जातपात तर सोडा सारे राजकिय सामाजिक मतभेद विसरून शेतीच्या प्रश्नांचा चक्रव्युह भेदण्यासाठी एकत्र येऊ लागले आहेत. इतर क्षेत्रात स्थिरावलेली व यशस्वी झालेली शेतक-यांची मुले केवळ शेतीच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र येत असून हे महान कार्य सरकार वा केवळ नक्राश्रु ढाळणारी व्यवस्था करणार नाही हे त्यांना पटल्याने शेतीच्या सर्वतोपरि मदतीसाठी ते पुढाकार घेत आहेत.
शेतीतील स्त्रीशक्तीची ताकद व महत्व हे शेतकरी संघटनेनेच ओळखले होते. आजच्या कठीण व गंभीर परिस्थितीत ही शक्ती जर सक्रीय झाली तर शेतीला एका नव्या विकासाचे परिमाण लाभू शकेल. नाही तरी आजवर कशीबशी टिकून राहीलेली शेती ही या स्त्रीशक्तीच्या बळावरच आहे हे शेतीच्या जाणकारांना जाणणे नवे नाही. येणा-या काळात बाकी सर्व अनुत्पादक फाफटपसारा विसरून शेती एके शेती हा एकच कार्यक्रम हाती घेतल्यास या क्षेत्राची या कचाट्यातून सुटका होईल, अन्यथा नाही.
डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmsil.com. 9422263689



No comments:

Post a Comment