Thursday, 28 September 2017

आर्थिक अनार्थिक निर्णय.



               आर्थिक अनार्थिक निर्णय.
चलनातून पाचशे व हजारच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयाला नोटबंदी, नोटाबंदी, निश्चलीकरण वा चलनबंदी अशा वेगवेगळ्या नावानी संबोधत तो आर्थिक असल्याचा दाखवत देशापुढे उभ्या ठाकलेल्या अनेक संकटांवरचा तो एक रामबाण उपाय आहे असे भासवले जात आहे. या मागचा विचार आर्थिक असावा असे मानले तर साऱ्या समस्या व उपाय यांची मांडणी अशा तऱ्हेने केली जाते की एक तर आपल्याला आपल्या समस्या खऱ्या अर्थाने समजल्याच नाहीत वा दुसरीकडे चलनबंदीही तशी समजलेली नाही. यातील समंजसपणापेक्षा एक राजकीय अपरिहार्यता व अगतिकता यांच्यातून भावनेच्या भरात केलेली आततायी कृती असा अर्थ जास्त ध्वनित होतो. एकंदरीत आपली अर्थसाक्षरता व चलनासंबंधी घेतलेल्या निर्णयातून उभरणारी रोमांचक नाट्यमयता येऊ शकत असल्याने त्याचा मोह न आवरला गेल्याचे दिसते आहे.
सुरुवातीपासून या निर्णयाला एका नाट्यमयतेचा साज चढवला जात होता. अर्थशास्त्रात तशी कुठली जागा नसलेल्या मानवी स्वभाव व भावनांचा उपयोग करत युध्दसदृश परिस्थितीतील आणीबाणी निर्माण करण्यात आली. अतिरेक्यांचे कंबरडे मोडू, काळ्या पैशावाल्यांची निंद हराम करू, खोट्या चलनाला पाताळात गाडू अशी भाषा वापरत आता आपल्याला व देशाला या संकटातून सोडवायला कोणी मसिहा आला आहे व तो मी आहे असे बिंबवण्याचा प्रयत्न होत होता. ज्यांना अर्थशास्त्र थोडेफार कळते त्यांना हा बालिशपणाच वाटत असला तरी ज्या कर्कशतेने हे माध्यमांतून आदळत होते ते बघता पुढे आता काय होणार याची कल्पना असल्याने सारे गप्प बसल्याचे दिसले. नाही म्हणायला सोशल मिडियावर अनेक शंका कुशंका व्यक्त होत असल्यातरी मॅनेज केलेल्या वॉररुम मधील भक्त हे अशा रितीने तुटून पडत की त्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल जाऊ लागली. मात्र मोदींचा हा एकखांबी तंबू पन्नास दिवसापर्यंत लढवला गेला तरी त्या दरम्यान उघड झालेले वास्तव हे याच्या यातना भोगूनही हाती काहीच न पडल्याचे दिसताच सामान्यांना त्यात काहीतरी चुकल्याचे जाणवल्याचे दिसले. पन्नास दिवसांनंतरच्या मोदींच्या भाषणातून साऱ्यांनाच जे काही जाणवले त्यातून या निर्णयाची सखोल व शास्त्रीय मीमांसा होण्याची वेळ आल्याने काही प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतील.
अतिरेकी व त्यांच्या कारवाया यांचे देशपातळीवरचे एकंदरीत आकलन काय आहे याची कल्पना नसली तरी केवळ काही नोटा बंद केल्याने त्यांचे कंबरडे कसे मोडेल हे सूज्ञ मनास पटले नाही. तसे असते तर भारतापेक्षा अतिरेक्यांनी बाधित अनेक देशांनी हा उपाय कधीच अमलात आणला असता. अगदी अमेरिकेसारख्या देशावरही अतिरेकी हल्ले झाले तरी त्यांनी त्यांच्या चलनाला हात लावण्यापेक्षा अतिरेक्यांची आर्थिक कोंडी करण्याचे अनेक मार्ग सक्षमतेने वापरले. भारतातही गेल्या पन्नास दिवसात शहीद झालेल्या भारतीय जवानांची कलेवरे परत येताहेत त्यावरून काश्मिरमधील अतिरेकी कारवायांवर काही फरक झाल्याचे दिसत नाही.
 काळा पैसा व खोट्या नोटा हे आपल्या व्यवस्थेतील दोषांचे परिणाम आहेत. कारणे नव्हेत. कारणे जिथे आहेत ती जागा खरे म्हणजे सरकार व आपल्या व्यवस्थांत आहे. त्याची सर्वस्वी वैधानिक व नैतिक जबाबदारी आजवर न पाळल्याने काट्याचा नायटा झाला आहे. यात लगेचच पक्षीय अभिनिवेश येऊन कुणी काय केले याच्या लेखाजोख्यावर चेंडू टोलवला जातो. यात पक्षीय अभिनिवेशापेक्षा आपल्या राजकीय व्यवस्थेचा व राष्ट्रीय चारित्र्याचा पोत काय आहे हे बघता सारे पक्ष, काही अपवाद वगळता हे आपल्या लक्ष्य, उद्दिष्ट व व्यवहारात एकजात सारखे असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे एकाद्या पक्षात आपले उद्दिष्ट साध्य न झाल्यास ज्या सहजतेने एकमेकांची सरमिसळ होते त्यावरून राजकारणाचे व्यावसायीकरण करत त्याला बाजाराचे स्वरुप आले आहे.
आज काळ्या पैशाला ज्या मानसिकतेने गुन्हेगार ठरवले जात आहे त्यापेक्षा तो तयार होणाऱ्या जागा, पध्दती व कर्ते यांच्यावर लक्ष गेले पाहिजे. काळा पैसा हा केवळ कर चूकवलेला पैसा अशी भाबडी व्याख्या न करता अप्रामाणिक व बेकायदेशीर व्यवहारातून निर्माण झालेला व उघड न दाखवता येणारा पैसा असे म्हणता येईल. आता देशातील सारे आर्थिक व्यवहार हे जेवढ्या प्रमाणात प्रामाणिक वा अप्रामाणिक असतील तेवढ्या प्रमाणात हा पैसा काळा वा पांढरा असू शकेल. यात उद्योजक, व्यापारी वा व्यावसाईक यांच्याकडून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशापेक्षा राजकीय लाचखोरी व प्रशासकीय भ्रष्टाचार यातून निर्माण होणारा काळा पैसा हा अधिक घातक असतो. कारण सुधाराच्या शक्यता ज्यांच्या हाती एकवटल्या आहेत तेच यात अडकल्याने ते काही सुधार होऊ देतील हे संभवत नाही. ते जास्त घातक आहे. नुकतेच राजकीय पक्षांनी आपले आर्थिक व्यवहार सार्वजनिक करण्याच्या प्रश्नावर साऱ्यांनी घेतलेली भूमिका हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. टिकेचा धनी होण्याची शक्यता गृहित धरूनही म्हणता येईल की उद्योग, व्यापारातील काळा पैसा हा कोंडी झालेल्या व्यवस्थेतून काढलेला एक पर्याय आहे व अर्थव्यवस्था कुंठीत न होऊ देता ती चालू ठेवण्यात त्याची महत्वाची भूमिका असते. जूनाट क्लिष्ट कायदे व त्याचा भलताच अर्थ लावणारी कर संकलक व्यवस्था, न्यायालयीन विलंब  यांनी कर्कश झालेल्या अर्थव्यवस्थेत वंगण म्हणून हा काळा पैसा काम करीत असतो व व्यभिचार वाईट असला तरी वेश्या व्यवसायाची अपरिहार्यता जशी अधोरेखित केली जाते त्यानुसार याकडे बघायला हवे.
राहिला प्रश्न खोट्या चलनाचा. आपल्या अर्थव्यवस्थेत एकंदरीत या खोट्या चलनाचे प्रमाण किती आहे याबद्दल केवळ तर्क केले जात. त्याचा निश्चित आकडा कोणालाही कधी ठरवता आला नाही. तो केवळ असल्याचे मान्य करत वा गृहित धरत त्यावर कारवाई करावी लागते. नवीन चलन आणतांनी त्यातील प्रतिबंधात्मक तांत्रिक सुधार वा मूळ उगमावर केलेली सक्षम कारवाई या उपायांचा समावेश होतो. या साऱ्या प्रश्नांवरची उपाय योजना ही जनतेपेक्षा जनतेने सोपवलेल्या सरकारवर जास्त येते. सरकारनेच आपल्या एकंदरीत कारभारात प्रामाणिकपणा व सचोटी आणली तर नैतिकतेला वाव मिळत जनमानसाचा धाक व रेटा तयार होऊ शकतो. आज आपल्या साऱ्या सार्वजनिक जीवनात ज्या मूल्यांना अधिष्ठान प्राप्त होत जी मानसिकता  साऱ्यांवर प्रभुत्व गाजवते आहे ती देशात नैतिक मूल्यव्यवस्था निर्माण होण्यात मुख्य अडथळा आहे. त्यात जेवढी शुध्दता येईल त्या प्रमाणात ही संकटे नाहीशी होऊ शकतील. असे झटके देत कोणी शर्यत जिंकत नाही. त्याला एका लक्ष्याची व सातत्याने प्रामाणिकपणाने केलेल्या प्रयत्नांची जोड लागते हे आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आले तरी पुरे
                                                                                डॉ. गिरधर पाटील.


 सारअतिरेकी कारवाया, काळा पैसा वा खोटे चलन यांचे यातून निर्मूलन होणार असल्याने नागरिकांनी आता एका मोठ्या आव्हानाला सज्ज व्हावे असे वातावरण तयार केले जात होते. यात होणाऱ्या त्रासाची तशी अगोदरच कल्पना असल्याने सामान्यांचे पुढील काळात होणारे फायदे वा देशभक्ती म्हणून का होईना आता त्यागाला तयार व्हावे

अर्थक्रांती !! नागरिकांची ? देशाची ? की सरकारची ?



अर्थक्रांती !! नागरिकांची ? देशाची ? की सरकारची ?
          देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती जेवढी सक्षम तेवढी देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. आणि हे दोन्ही घटक सरकारचे याबाबतचे आकलन, त्यावर आधारलेली एकंदरीत धोरणे व त्यांची अमलबजावणी यांच्याशी निगडीत असतात. म्हणजे हे सारे घटक सापेक्ष असून त्यांच्या परस्पर संबंधांतून देशाच्या अर्थव्यवस्थेची वास्तव मीमांसा करता येते. ज्याची व्याप्ती अजून कोणालाही अवगत नाही असा काळा पैसा हा भारतीय अर्थकारणात नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. खरे म्हणजे काळ्या पैशांचा उगम वा वावर हा ज्या क्षेत्रात असतो ते लपून न राहिल्याने आपली कर व्यवस्था अशी निकोप करायची की काळ्या पैशांचे प्रमाण नगण्य असावे हे खरे असले तरी त्याला कारणीभूत असणाऱ्यांवरच त्याचा निपटारा करायची वेळ आली म्हणजे ते काम किती कठीण आहे हे आपण या दिशेने टाकलेल्या चलनबंदीच्या निर्णयातून अनुभवत आहोत.
हा विषय समजून घेतांना अर्थशास्त्र समजले नाही तरी काही मूलभूत आकडेवारी समजून घेतली पाहिजे. सरकारच्या व्याख्येनुसार ज्या उत्पन्नावर कर भरला जात नाही ते उत्पन्न काळे समजले जाते. ही व्याख्या परिपूर्ण नाही. तरीही कर भरण्याच्या प्रक्रियेशी ती जोडताच देशात कर भरणाऱ्या नागरिक, उद्योग वा आस्थापना यांच्याशी ती संलग्न करता येते. आता कर भरणाऱ्यांची संख्या ही देशाच्या लोकसंख्येच्या अडीच टक्के असल्याचे सांगितले जाते. यातील बव्हंशी करपात्र असलेले पगारदार असून त्यांचा कर कुठल्याही अनिमियतांशिवाय सरकारकडे जमा होतो. राहिलेल्या करदात्यांवर कडक नजर ठेऊन त्यांच्या उत्पन्नानुसार कर संकलित करणे हे फार कठीण काम असे नाही, मात्र याला करसंकलन व्यवस्था प्रामाणिक, हस्तक्षेपविरहित व तत्पर असावी लागते. शिवाय काळा पैसा हा केवळ कमवलेल्या उत्पन्नावरील बुडवलेला कर असा नसून अबकारी कर, विक्रीकर, सेवा कर अशा अनेक करांच्या वसूलीतील अनिमितपणामुळे निर्माण होत असतो. शिवाय याबाबतच्या साऱ्या तक्रारी, चौकशा, लवाद या सरकारच्याच अखत्यारित येतात. त्यांचा त्वरेने व प्रामणिकपणाने निपटारा करणे ही सरकारचीच जबाबदारी असते. म्हणजे या साऱ्या प्रक्रियेत सरकारशी संबंधित कर संकलन व्यवस्थेचा घनिष्ठ संबंध दिसून येतो. ही व्यवस्था जेवढी निकोप तेवढा काळा पैसा मर्यादित असे समीकरण मांडता येते.
यातील काळ्या पैशाचा दुसरा उगम हा नागरिकांनी भरलेल्या पांढऱ्या पैशातून म्हणजे सरकारी खर्च व सरकारच्या एकंदरीत राबवल्या जाणाऱ्या योजनांवर होणाऱ्या खर्चातून होत असतो. यातील सरकारची कळीची खाती व जागा या तशा लपून राहिलेल्या नाहीत. एक सर्वसाधारण प्रघात असा आहे की कुठलीही योजना, टेंडर वा खरेदीमान्यता यातील ठराविक टक्केवारी ही संबंधितांना पोहचल्या शिवाय ती जनतेच्या हितास पात्र आहे असे होत नाही. यात राजकीय व्यवस्थेचा व प्रशासनाचा वाटा अगदी बिनबोभाटपणे दरपत्रकानुसार ठरलेला असतो. हे उत्पन्न कुठल्याही करप्रणालीत येत नसल्याने स्थावर मिळकत, जमीनी, सोने वा शेअर्स अशा मार्गानी अर्थव्यवस्थेत येत असतो. हा खोटा पैसा खऱ्या पैशाला वाव देत नसल्याने या साऱ्या क्षेत्रातील वाढते दर प्रामाणिक क्षेत्राला यातून बाहेर ढकलत असतात. राजकीय मंडळींच्या एकंदरीत संपत्तीच्या चर्चा वा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टाकलेल्या धाडीतून हाती लागणारे घबाड यांतून असा पैसा किती असावा हे लक्षात येते. यातले सारे घटक हेही शेवटी सरकार या व्यवस्थेशी निगडित असल्याने त्याबाबत त्यांनीच काही केले तर होऊ शकेल. याचाच साधा अर्थ असा आहे की काळा पैसा हा शेवटी सरकारमुळेच निर्माण होत असल्याने आपल्यात सुधार केल्याशिवाय त्यात काही बदल होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
मात्र कुणीतरी उपभोगलेल्या सुखाचा परिणाम म्हणून येणाऱ्या प्रसववेदना मात्र आता देशभक्तीच्या नावाने सर्वसामान्यांनीच भोगाव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक खोट्या चलनाचा थोड्याफार प्रमाणात होणारा निपटारा बघितला तर ज्या मात्रेत काळा पैसा उघड होईल असे सांगितले जात होते ते घडतांना दिसत नाही. एक उपाय खुंटला की सरकार लगेचच नवे नवे निर्णय घेत असते. त्यानुसार आता काळा पैसा असणाऱ्यांना तो उघड करण्यासाठी आमिषे दाखवत नव्या नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत. हा सारा गोंधळ विषयाचा अभ्यास, परिस्थितीचे आकलन न करतांच केल्याने देशातील सामान्य जनता अगदी शेतकऱ्यांसकट भरडली जात आहे. किमान त्यांना काही दिलासा मिळावा अशी पावले सरकारकडून टाकली जात असल्याचे दिसत नाही.
या विषयात अभ्यापूर्व योगदान देणाऱ्या अर्थक्रांतीनुसार मोठ्या किमतीचे चलन अर्थव्यवस्थेतून बाद करणे हा उपाय सुचवलेल्या पाच कलमांपैकी एक आहे. या कलमापूर्वी देशातील कर व्यवस्थेतील क्रांतीकारी बदलाचे नावही सरकार घेत नाही. याच सरकारची काळ्या पैशाबाबतची निवडणुकीपर्वीची भूमिका निवडून आल्यावर फारशी गंभीर नव्हती.  आता सरकारचे अचानकपणे काळ्या पैशावर गंभीर व प्रामाणिक होणे हेही संशयास्पद वाटते.  निवडणुकीत काळा पैसा हा एक महत्वाचा मुद्दा होता व मला सत्ता द्या म्हणजे या साऱ्या काळा पैशाचा शोध घेत प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होतील हे आश्वासन जनता अजूनही विसरलेली नाही. सरकार यावर काही करीत नसल्याचे बघून शेवटी सर्वौच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसआयटी नेमली गेली. काळा पैसा भारतात आणण्यावर अनेक सबबी सांगितल्या जाऊ लागल्या. परदेशी बँकांच्या माहितीनुसार हे काळा पैसा ठेवणारे कोण आहेत हे न्यायालयाचा आदेश असतांनाही सरकार सांगू शकले नाही. देशांतर्गत काळा पैसा बाळगणारी तमाम मंडळी म्हणजे उद्योगपती, व्यापारी, बिल्डर्स, व राजकारणी यांच्या विरूध्द कारवाई म्हणजे स्वतःवरच कारवाई असे समीकरण असल्याने त्याबाबतीतल्या अनेक चौकशा, कारवाया जैसे थे ठेवण्यातच सरकारची मानसिकता दिसून आली. एवढेच नव्हे तर आपले उद्योग आपल्या तथाकथित ताळेबंदानुसार  तोट्यात असल्याचे दाखत सरकारी बँकांची कर्जे एनपीए करत त्या बँकांतील प्रामाणिक नागरिकांचा पैसा हडप करणाऱ्यांना अभय व शेतकऱ्याचे पाचपंचवीस हजार थकले म्हणजे त्याच्यावर जप्तीची कारवाई ही परंपरा हे सरकारही खंडीत करू शकले नाही.
अशा या देशभक्त सरकारला शेवटी सामान्य नागरिकांना देशभक्तीचे आवाहन करत आपल्या चुकांचे प्रायश्चित्त घ्यावे म्हणून आळवणी करावी लागते यातच या प्रयत्नाचे मर्म दिसून येते. 
                                                       डॉ. गिरधर पाटील 9422263689

Saturday, 9 September 2017

धावण्याच्या शर्यतीत टांग्याचे घोडे !!



              बदलामागची मानसिकता
अखेर धक्कातंत्राचे सारे निकष पूर्ण करणारा केंद्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. नेहमीप्रमाणे माध्यमांकडे आलेली सुत्रांची माहिती व प्रत्यक्षात घडत जाणाऱ्या बाबी बघता  आपण किती बेअंदाजी (अनप्रेडिक्टेबल) वा अविश्वसनीय आहोत हे सिध्द होत होते. मात्र नोटाबंदीच्या धक्कातंत्रात जो काही आवेश वा नाट्यमयता होती तिची जागा आता मात्र गूढतेने घेतल्याचे दिसते. एकंदरीत हा कार्यपध्दतीचा एक भाग असला तरी या कसरतीतून ज्या काही बाबी पुढे येताहेत त्यावरून राज्यकारभाराची घडी घालत असल्याचे दाखवत आपण ती पार विसकटून तर टाकत नाही ना अशी शंका वा भिती डोकावू लागली आहे.
उदाहरणार्थ काही निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा मंत्रीमंडळात झालेला समावेश. उजळ पूर्वेतिहास असणाऱ्या कुणालाही लोकशाहीत वैधानिक वाव असायलाच हवा, परंतु आता येणाऱ्या व उपलब्ध माहितीवरून या सनदी अधिकाऱ्यांबाबत तेवढी स्पष्टता दिसत नाही. विशेषतः त्यांच्या गुणांमध्ये व्यक्तीगत मदतीचा जो एक धागा दाखवला जातो तो लोकशाहीत आवश्यक असणाऱ्या व्यापक जनहिताच्या विरोधात जाणारा आहे. हे अनुषांगिक मुद्दे एकवेळ बाजूला ठेवले तरी प्रशासनाची जी काही घडी असते, ती विस्कटत त्यांच्यात आजच आपल्या कुठल्या कलागुणांची कदर होणार आहे याबाबत चूकीचा संदेश जात आपण कुठल्या दिशेने जायला हवे हेही प्रशासनाला नकळत दर्शवले जात आहे. नाहीतरी निवृत्त होण्यापूर्वी आपले व्यक्तीगत लाभ पदरात पाडून घेणारे सनदी अधिकारी असा पायंडा पाडत असले तरी त्यांना अशा पातळीवरची वैधानिकता प्राप्त होणे हे चिंतनीय आहे.
आपण स्विकारलेल्या लोकशाहीत निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी व त्यांची अंमलबजावणी करणारे प्रशासन मिळून सरकार नावाची यंत्रणा तयार होते. निर्णय घेणाऱ्यांची मानसिकता, ज्ञान वा कौशल्ये ही त्यातील जबाबदारीसह अमलबजावणी करणाऱ्यांपेक्षा निश्चितच वेगळी समजली जातात. अंमलबजावणी करणाऱ्यांचे जे काही वैचारिक रेजिमेंटेशन झालेले असते त्या मानाने जनतेतून निवडून आलेल्यांचे विचार वा आचार लवचिक, व्यापक व प्रगल्भ असू शकतात. प्रशासनाची मानसिकता ही सुरक्षितता जोपासणारी व स्वतंत्र निर्णयाला लागणाऱ्या धाडसाविरहित असते. जोखमीसह निर्णय घेणे हे मते मिळवून जनभावना व्यक्त करू शकणाऱ्या लोकप्रतिनिधींना शक्य असते व  आज त्यासाठीचा उपलब्ध पर्याय तोच समजला जातो. त्यानी घेतलेला निर्णय हा राजकीय, सामाजिक वा आर्थिक परिणामकारक असला तरी तो त्याच्या जबाबदारीचा एक भाग असतो. त्यात व्यक्तीगतता नसते.  उलट हे निर्णय राबवणारे प्रशासन हे मुख्यत्वे एक वेगळी मानसिकता जोपासत कार्यरत असते व त्यासाठी एक विशिष्ट आचारप्रणाली वा कार्यपध्दतीचे बंधन त्यांच्यावर असते. मुख्यत्वे त्यांचे पोट त्यावर अवलंबून असते. त्यांनी या व्यवस्थेत कार्यरत असण्यामागची ती एक मुख्य प्रेरणा असते. आदेश पाळणे व तो पाळतांना काही निकषही निश्चित करणे हा त्यांच्या कार्यपध्दतीचा गाभा असतो. थोडक्यात युध्द करावे वा करू नये हे ठरवणारा जसा सेनापती असतो व ते प्रत्यक्ष करण्याची जबाबदारी सैन्यावर असते तशी ही विभागणी असते.
अशा या लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संघर्षस्थळे नेहमीच अधोरेखित झाली आहेत. लोकप्रतिनिधींनी घेतलेले निर्णय प्रशासन जुमानत नाही अशी तक्रार खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या केली आहे. त्यामुळे काहीशा विरोधाभासी वाटणाऱ्या मानसिकता या मंत्रीमंडळासारख्या निर्णयप्रक्रियेला जबाबदार असलेल्या संस्थेत आणाव्यात हे काहीसे लोकशाही विरोधी ठरण्याची शक्यता आहे. या साऱ्यांना सध्या तरी राज्यमंत्रीपदाची धुरा देऊन अंमलबजावणीचीच जबाबदारी सोपवली असली तरी त्यासाठीसुध्दा स्वंतत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता लागते हे महत्वाचे. त्यामुळे या पायंडातील आजवरच्या सनदी अधिकाऱ्यांच्या समावेशाचा अनुभव बघितला तर फारसा उल्लेखनीय आहे असे नाही, मूलतः ते लोकशाहीला अपेक्षित नाही.
यातला दुसरा महत्वाचा भाग स्पष्ट होतोय की असे हे सनदी अधिकारी प्रसंगी स्वार्थासाठी होयबाची भूमिका वठवत व्यापक जनहिताला खोडा घालू शकतात. असे होयबा कधी प्रश्न विचारत नाहीत. मोदींच्या एकंदरीत कारभारातून काही लोकप्रतिनिधींचा सूर प्रश्न विचारण्याचा दिसू लागला होता. मोदींनी प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी बाजूला ठेवत निमूटपणे काम करणारे सनदी निवडल्याचे दिसते. शिवाय या साऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी आपली निष्ठा अगोदरच जाहीर केल्याने त्यांना हे बक्षिस मिळालेले दिसते. त्यांनी त्यावेळी घेतलेले निर्णय हे योग्य असतीलच असे नाही कारण देशात कार्यरत असलेल्या हजारो सनदी अधिकाऱ्यांत हे एवढेच भाग्यवान ठरावेत अशी काही यांची कारकिर्द दिसून आलेली नाही. एक उपकाराची परतफेड म्हणून जर लोकशाहीतील जनहिताची एक महत्वाची प्रक्रिया जर विचार न करता कुणावर सोपवली जात असेल तर ते लोकशाहीला घातक ठरण्याची शक्यता आहे.
या मंत्रीमंडळ विस्ताराची वेळही आताच निवडावी लागलेली दिसते. आजवर यश व एकमेव यश या मानसिकतेत वावरणाऱ्या सरकारचे अपयश एकापाठोपाठ जाणवू लागले होते. नोटाबंदीचे परिणाम रिझर्व बँकेने जाहीर केल्याबरोबर जनतेच्या मनात त्या यशापशाबाबत जे संभ्रमाचे वातावरण होते ते निश्चिततेत परावर्तीत होऊ लागले होते. देशातील शेतकरी, कष्टकरी वर्गाचे त्यामुळे झालेले नुकसानीची कुठेच दखल घेतली गेली नाही. त्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी वा हमी भावाचे प्रश्न सरकार योग्य रितीने हाताळू शकले नाही. त्यात काश्मिरचा दिवसेंदिवस चिघळत जाणारा प्रश्न, पाकिस्तान व चीनच्या धमक्या या साऱ्या पार्श्वभूमीवर मोदींची जादू निष्प्रभ ठरू लागली होती. त्यामुळे देशात काहीतरी गंभीरतेने होतेय हे दाखवणे क्रमप्राप्त होते त्यातून हे मंत्रीमंडळ विस्ताराचे धक्कातंत्र अमलात आणल्याचे दिसते.
एकंदरीत अपरिहार्य ठरल्यानेच हा मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला असला तरी त्यासाठीची कारणे मात्र परस्पर विरोधी दिली जातात. कारभारात सुधारणा या कारणातच अगोदरच्या कारभाराचे मूल्यमापन दडले आहे. जून्यांना का काढले वा नव्यांना का घेतले याची कारणे स्पष्ट होत नसतांनाच पंतप्रधानांनी मात्र नव्यांना भ्रष्टाचारापासून लांब रहाण्याचा सल्ला दिला आहे. यात कबूलीजबाब आहे की सावधानतेचा इशारा हेही आपणच ठरवायचे आहे. खरे म्हणजे या सरकारात विकसित झालेल्या नव्या कार्यपध्दतीनुसार अन्यांना काही स्वतंत्रपणे करण्याची मुभा नसतांना चांगल्या वा वाईट कारभाराची अपेक्षा व्यर्थ आहे. पळतीच्या घोड्यांच्या शर्यतीला कमी पडणारी संख्या पुरी करण्यासाठी शेवटी टांग्यांच्या घोड्यांना पाचारण करावे व सर्वकाही आलबेल आहे असे दाखवावे अशीच ही सारी परिस्थिती आहे.
                                                                         डॉ. गिरधर पाटील.




   

Thursday, 29 June 2017

कृषि शोषणाचा राजमार्ग !!



             कृषि शोषणाचा राजमार्ग !!
          अनादि काळापासून शेती ही शोषणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे व सारा मानव जातीचा इतिहास हा शेतीच्या शोषणाचा इतिहास आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. अशा या शेतीचे अनेक मार्गानी शोषण होत असते. त्यात काही चोरवाटा आहेत, काही परंपरा वहिवाटीच्या रुळलेल्या वाटा आहेत तर काही सरकार प्रणित कायद्याने प्रस्थापित अधिकृत शोषणाचे राजमार्ग आहेत. आताच्या हायटेक सरकारांमुळे या शोषणाच्या मार्गातही आता फोरलेन वा सिक्सलेन महामार्ग दिसू लागले आहेत. अन्नसुरक्षा, कुपोषण वा महागाई निवारण यासारखे कल्याणकारी बुरखे चढवत सरकार शोषणाचे नवनवे मार्ग शोधत असते. या व्यापक व तीव्र शोषणप्रक्रियेमुळे सारा शेती व्यवसाय हा पराकोटीच्या विपन्नावस्थेला पोहचला असून उत्पादक व पोशिंद्या समाजाने त्याचा परामर्ष घेणे आवश्यक आहे.
मानवाच्या ज्या मूलभूत गरजा समजल्या गेल्या आहेत त्यात अन्नाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित झाले आहे. हवा व पाण्यासारख्या इतर गरजा सहजप्राप्य असल्यातरी अन्नाच्या शोधासाठी मानवाला बरेच प्रयत्नशील रहावे लागले आहे. त्यामुळे मानवी जीवनाचा सारा इतिहास बघितला तर तो अन्नाशी संबंधित अशा शेतीचा उगम, विकास, व्यापार व प्रक्रिया यांच्याशी जुळलेला दिसून येतो. अन्य प्राण्यांची शिकार करून मिळवल्या जाणा-या अन्नविषयक गरजांमध्ये व इतर सुरक्षिततांमध्ये औद्योगिक प्रयत्नांचा वाटा दिसून येतो. यात विविध प्रकारची हत्यारे, त्याला लागणारे धातुंसारखे मूळ घटक यांचे शोध लागलेले दिसतात. निसर्गनियमित सृजनात्मक शेती व मानवी कल्पकतेने भारलेले औद्योगिक क्षेत्र यातील संघर्षस्थळे आजही अधोरेखित करता येतात व या दोन संस्कृतींचा स्पर्धात्मक प्रवासाचा आलेख आजही मानवी जीवनाच्या साऱ्या क्षेत्रात तसाच प्रभावी असल्याचे दिसते. या साऱ्या सकारात्मक चित्राची एक काळी बाजूही आहे ती म्हणजे या क्षेत्रांचे शोषण. आपण स्वतः उत्पादक नसलेलल्या सामाजिक घटकांनी आपल्या साऱ्या गरजा या उपलब्ध व्यवस्थेतून विनिमय टाळत भागवण्याचा मार्ग म्हणजे शोषण. शेतीतून निर्माण होणाऱ्या गुणाकारी उत्पादनावर तसा साऱ्यांचा हक्क निर्माण झालेला दिसतो. शेती उत्पादनातील वरकडीतून निर्माण होणारे भांडवल  व औद्योगिक क्षेत्रात श्रमांच्या शोषणांतून निर्माण होणारी भांडवली वरकड या शोषणप्रवण घटकांचे अस्तित्व आजही वेगवेगळ्या दृष्यअदृष्य स्वरूपात मानवी व्यवहारात दिसून येते.
मानवी इतिहासातील शेतीच्या उगमाचे स्थान लक्षात घेता आजच्या साऱ्या राज्य, अर्थ व समाज व्यवस्था यांचे मूळ हे शेतीच्या शोषणाशी संबंधित आहे, मात्र यातल्या शोषणाच्या बटबटीतपणाला अधिकृत व्यवस्था, कायदे व धोरणे यांचे आवरण चढवत ती सर्वमान्य व सुसह्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. या शोषणाचा तसा संबंध हा धर्मव्यवस्थेशीही जोडता येतो. धर्म जोपासना वा रक्षणाची जबाबदारी ही सामूहिक ठरवून दान, दक्षिणा मिळवल्या जात. वैदिक काळात ऋषिमुनींच्या सा-या यज्ञवैकल्याच्या साधनसामुग्रीची जबाबदारी त्यावेळच्या कृषिक्षेत्रावर सोपवलेली होती व त्यासाठी लागणारे धान्य, दुधदुभते वा पशु हे शेतीक्षेत्राकडून दान म्हणून घेतले जात. दान व दक्षिणा ही तशी आजच्या कराशी तुलना करता भावनिक स्तरावरची भययुक्त देवाणघेवाण असेही समजता येईल. शेतीवर त्यावेळच्या जातीव्यवस्थेचाही पगडा दिसून येतो. शेती व्यवसाय हा जाती व्यवस्थेत अत्यंत कनिष्ट म्हणजे शूद्र वर्गाशी जोडला आहे तर शेतीचा व्यापार हा त्याहून थोडा श्रेष्ठ म्हणजे वैश्य वर्गाशी जोडला गेलेला दिसतो.
शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिरात या विषयावर खोलवर चर्चा होत एक सम्यक असे प्रारूप साकारले आहे व शेतीचा उगम, तिच्यात आजवर होत गेलेल्या चांगल्यावाईट बदलांचा मागोवा घेत आजही शेतीचे प्रश्न कसे गहन होत गेले याचे उत्तर त्यातून शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. अदिमानवाच्या अगदी प्राथमिक जीवनात जेव्हा गर्भार स्त्रीच्या वावरावर निर्बंध येत शारिरिक अवस्थेमुळे एकाच ठिकाणी रहाणे भाग पडत असे, त्यावेळी तिला आणून दिलेल्या फळे वा अन्नधान्याची बीजे तेथेच आसपास कुठेतरी टाकली जात. तेव्हा पहिल्यांदा तिच्या लक्षात आले की ही बीजे परत पुनर्जिवित होत त्यातून त्याच प्रकारचे अन्नधान्य निर्माण होत आहे. हा शेतीचा उगम होता व काही अन्नधान्यासाठी लांबवर कुठे न भटकता या बिया पेरल्या तर अन्नाचे उत्पादन होऊ शकते याचे गमक उपलब्ध झाल्याने ती स्त्री आपल्या गरजेची वा पसंतीची बीजे पेरत शेतीचे उत्पादन घेऊ लागली. मात्र यासाठी लागणा-या जमीनीचे सखलीकरण वा सिंचनाच्या व्यवस्था यात पुरुषाची जोड मिळत गेल्याने अन्न उत्पादनाचे सारे स्वरूप व प्रमाणच बदलत गेल्याचे दिसते. याचा दुसरा महत्वाचा फायदा असा झाला की या अदिमानवाचे भटकंतीचे जीवन संपून त्याला एक भौगोलिक स्थैर्य आले व मानवी कळपांचे वसाहतीत रुपांतर होत शेतीसाठी बैल, घोडे यासारख्या पाळीव प्राण्यांचा उपयोग व दुधदुभत्यासाठी गाईम्हशी, शेळ्यामेंढ्यांचा उपयोग होऊ लागल्याचे दिसते.
आपले सामाजिक अस्तित्व जसे उद्यमशील वा उद्योजकीय प्रेरणांनी भारलेले दिसून येते त्याचवेळी समाजात काही एक न करता आपल्या गरजा कशा भागवता येतील अशा वर्गाचे अस्तित्वदेखील दिसून येते. आपल्याकडील काही घटकांकडे अतिरिक्त अन्नधान्य वा पशुधन उपलब्ध असल्याचे लक्षात येताच त्या कशा मिळवता येतील याकडे या वर्गाचे लक्ष जाऊ लागले. उत्पादक समाज हा तसा पापभिरू व गाववस्तीच्या स्वरूपात कळपात रहाणारा समाज होता. या समाजातील सर्व घटकांत सांमजस्याने संवाद साधत कुटूंब, विवाहादि व्यवस्था निर्माण करत एक समानता व सहिष्णुतेची सामाजिक संस्कृती निर्माण होत होती. मात्र त्याचवेळी कुठलेही सामाजिक संदर्भ वा जाणीवा नसलेला एक वर्ग दऱ्याखोऱ्यात रहात आपली वेगळीच जीवनशैली विकसित करीत होता. यात प्रामुख्याने शेतातले पिक तयार झाले की या वसाहतींवर हल्ला चढवायचा व सारे पिक लुटून न्यायचे व आपल्या अन्नविषयक गरजा भागवायच्या याचा त्यात भाग असे. या संदर्भातील इतिहासात अन्नधान्य वा पशुधन या बरोबर स्त्रीयांचीही लूट होत असल्याचे दाखले सापडतात. या दरोडेखोर टोळ्यांची संख्या व हल्ल्याचे प्रमाण वाढते होऊ लागल्याने या दोन विरोधाभासी संस्कृतीतील संघर्ष विकोपाला जाऊ लागला व सुसंस्कृत समाजाने या हल्लेखोरांशी संवाद साधायला सुरवात केली.
          जोवर या जंगली समाजाला स्वतःची अन्नविषयक गरज भागवण्याची इच्छा, साधने वा क्षमता प्राप्त होत नाहीत तोवर या समाजाच्या गरजांचे वास्तव स्विकारणे क्रमप्राप्त होते.  सुसंस्कृत समाजाने या साऱ्यांना एक प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला लागते ते द्यायला तयार आहोत मात्र ही लूटमार सोपी जावी म्हणून तुम्ही जो हिंसाचार वा अत्याचार करत आमच्यात दहशत पसरवता व आमच्या स्त्रिया-मुलाबाळांचे वा मालमत्तेचे नुकसान करता ते टाळावे म्हणून आम्ही स्वतःहून ठरेल ते आपणास स्वखुषीने द्यायला तयार आहोत. मात्र आपण एका ठराविक वेळी यावे व आपला हिस्सा घेऊन जावा. हा प्रस्ताव तसा जंगली समाजाला सोईचाच होता कारण इतर टोळ्यांशी स्पर्धा टाळत सहजगत्या लूट मिळत असेल तर ती कोण नाकारणार हाही भाग त्यात होताच. इकडे सुसंस्कृत समाजाने काही तरी देऊन आपल्या सुरक्षिततेची हमी मिळवली व एवीतेवी वरकड ठरणाऱ्या बाबींमधून ती मिळणार असेल तर त्याबद्दल फारशी खंतही बाळगण्याचे कारण नव्हते.
म्हणजे आम्ही तुम्हाला सुरक्षितता देतो (दुस-या अर्थाने म्हणजे तुम्हाला त्रास देणार नाही व तुमच्यावर अन्यायही करणार नाही) त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काहीतरी द्या या साध्या व सोप्या समीकरणावर आजचे अत्यानुधिक जग सरकार व त्यावर राज्य करणारी व्यवस्था या सरकार (State) नावाच्या अवस्थेला पोहचली आहे. म्हणजे सरकार नावाच्या व्यवस्थेचा उगमच अशा एका सुसंकृत समाजाने जंगली समाजाशी केलेल्या कराराशी संबंधित आहे. यातील देवाणघेवाणीच्या वस्तुंमध्ये कर नावाची संकल्पना विकसित झाली व सरकार ज्या प्रमाणात विकसित होत गेले त्यातून या कराव्यतिरिक्त इतरही शोषणाचे मार्ग कसे विकसित होत गेले हेही पहाणे उद्बोधक ठरेल. ज्याला आपण कर म्हणतो हा मुख्यत्वे या सरकार नावाच्या व्यवस्थेला पोसण्यासाठी होता. काही न करता या व्यवस्थेत एकदा प्रवेश झाला की कायमचे फुकटच या आकर्षक प्रस्तावामुळे सरकार नावाची व्यवस्था फोफावणे स्वाभाविकच होते, (आजही सरकारी नोकरीचे जे काही आकर्षण दिसून येते त्यामागचे गमकही हेच असावे) त्यातून सरकारचाच स्वतःवरील भार वाढत गेल्याने सरकारला संरक्षणात्मक कामाबरोबर कल्याणकारी बुरखा चढवत आपल्या विस्ताराचे समर्थन करावे लागते आहे.
आज आपण म्हणजे, सारे शेतकरी जो सारा भरतो त्याचा इतिहासही असाच आहे. त्याकाळी या दरोडेखोरांच्या मुख्याला सरदार म्हणत. अशा अनेक सरदारांना कह्यात ठेवणारा राजा समजला जाई. या साऱ्यांची एक सरंजामी व्यवस्था होती. या राज्यात आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठी सरदारांना राजाला खंडणी द्यावी लागे. ही खंडणी प्रत्येक गावातून, वस्तीतून गावातीलच एक पाटील वा देशमुख नेमून त्यावर ही खंडणी गोळा करण्याचे काम सोपवले जाई. ही खंडणी त्या भागाचा वतनदार, सरदार यांच्यामार्फत त्या राजाकडे पोहचत असे. आपले राज्य म्हणजे जिवंत लोकांचा उत्पादक प्रदेशाचा भूभाग नसून खंडणी गोळा करण्याचा इलाखा असे त्याचे त्यावेळच्या राज्य या व्यवस्थेचे स्वरूप होते. त्यावेळची सारी युध्देही आपला इलाखा अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असे. ही व्यवस्था आजतागायत आपल्याकडे आहे तशीच चालू आहे. त्यासाठी महसूल नावाचे मुख्य खाते नेमले जाते व तलाठ्यासारखे मुलाजिम नेमून अधिकृत सारा गोळा करून शासनाच्या तिजोरीत भरण्याची पध्दत आहे.
याचाच अर्थ सरकारशी संबंधित सारी समीकरणे ही अशा मार्गाने उत्पादक समाजाकडून संपत्तीचे संकलन वा सार्वजनिक संसाधने ताब्यात घेऊन त्यांचा विनियोग करणे यापुरती मर्यादित दिसतात. सरकारला आपले अस्तित्व कायम ठेवण्याबरोबर त्याची अपरिहार्यताही निश्चित ठेवणे तेवढेच महत्वाचे असते. म्हणजे सरकार असावे असे नेहमीच नागरिकांना वाटावे असे वातावरण ठेवावे लागते. यासाठी सा-या समाजात असुरक्षितता राहील व भययुक्त वातावरणात नागरिक नेहमीच सरकारच्या बाजूने असावेत अशी योजना असते. प्रसंगी युध्दे वा परकीय आक्रमणांची मदत घेत सरकारे प्रबळ झालेली दिसून येतात. या सा-या घडामोडींसाठी सरकारची संसाधनांची गरज वाढती असते व त्याच्या पूर्ततेसाठी त्याला शोषणाचे निरनिराळे मार्ग चोखाळत सामान्यांच्या जनजीवनात प्राधान्याचे स्थान मिळवता येते.
सरकारची ही शोषणाची हत्यारे शेतीव्यतिरिक्त घटकांवर वापरतांना त्यावर खूप मर्यादा येतात. एकतर या घटकांची आवक निश्चित असल्याने त्यावरचा करही किती वाढवायचा यावर या मर्यादा येतात. शिवाय हे सारे घटक करीत असलेली परावर्तीत उत्पादने वा पुरवीत असलेली सेवा ही तशा अर्थाने उत्पादन ठरवण्यात अर्थ नसतो. शेती हा जगातील असा एकमेव उद्योग आहे की त्यात एका दाण्याचे हजार दाणे होत तशा अर्थाने उत्पादन होत असते. त्यामुळे एकाद्या सिंहाने शिकार मारल्यावर त्यावर ताव मारणारे कोल्हकुत्रे या शेतीच्या शोषणातही दिसतात. मात्र आपल्या सावजाला मारण्यासाठी सरकार नावाच्या सिंहाकडे काय काय हत्यारे आहेत हेही पहावे लागेल. यात शोषणाला वैधानिकता प्राप्त करून देणारे काही कायदे आहेत, तर काही ठिकाणी परंपरागत शोषणाच्या प्रथांचा आधार घेत त्याविरोधात काहीएक न करण्याची प्रवृत्ती दिसते. हे सारे शोषक कायदे आजच्या परिभाषेत शेती विरोधातील असल्याचे सिध्द होऊनही सरकार त्याबद्दल काही करायला तयार नाही.
शेतीच्या शोषणाचा सर्वात गाजलेला महामार्ग म्हणजे भारतातील बाजार समिती कायदा. शेतमाल बाजाराला बंदिस्त करून शेतमालाचे शोषण करणारा एक राक्षसी कायदा म्हणून तो ओळखला जातो. अलिकडच्या काळात या बाजार समित्या म्हणजे शेतक-यांचे कत्तलखाने असल्याचे म्हटले जाते. एक म्हणजे आशययुक्त शब्दांकित करण्याचा फरक सोडला तर अदिमानवाकडून शेतात माल तयार झाल्यावर तो लूटून नेणा-या दरवडेखोरापेक्षा हा कायदा वेगळा आहे असे मानता येत नाही. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आम्ही सांगू त्या ठिकाणी, सांगू त्याला, त्याच्या भावात विकावा असा हा कायदा म्हणतो. अर्थात या कायद्याचे पितृत्व ज्या इंग्रजांकडे जाते त्यांचा भारतावर राज्य करण्याचा मुख्य उद्देशच शेतीच्या शोषणाचा होता व आपल्या औद्योगिक उत्पादनाला सहज व स्वस्त कच्चा माल मिळवणे हा हेतु असल्याने त्यांना फारसा दोष देता येणार नाही. असे असले तरी त्यांनीसुध्दा हा कायदा करतांना त्याकाळी फोफावलेल्या अवैध व अन्यायकारी सावकारीचा हवाला देत शेतमाल विक्रिवर असे निर्बंध आवश्यक असल्याचे कल्याणकारी कारण देत हा कायदा आणला होता. म्हणजे एकीकडे संरक्षणाचे आमिष दाखवायचे व प्रत्यक्षात हेतु मात्र शोषणाचा हा इंग्रजाचाच नव्हे तर सरकार नामक व्यवस्थेचाच गुणधर्म म्हणून प्रकट झालेला दिसतो.
मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतरही हाच नव्हे तर असे अनेक कायदे दाखवता येतील की ते शेतीशोषणप्रवण असून देखील त्यांचा पुनर्विचार झाला नाही. एवढेच नव्हे तर घटनेद्वारा एक नागरिक म्हणून शेतक-यांना मिळालेल्या अनेक मूलभूत अधिकारांचा संकोच करत शेतीविरोधी अनेक नवे कायदे घटना दुरुस्तीच्या नावाने घुसडण्यात आले व त्या विरोधात न्याय वा दाद  मिळवण्यासाठी शेतक-यांना न्यायालयातही जाता येऊ नये अशी भरभक्कम तजवीज करण्यात आली. या घटनादुरूस्तीनुसार शेतक-यांना अगोदरच्या घटनेने दिलेला मालमत्तेचा अधिकार नाकारण्यात आला व त्याला अधिक शोषणप्रवण करण्यात आले. त्याला खेडण्यासाठी मिळालेल्या जमीनीच्या अधिग्रहणाबाबत सरकारला एकतर्फी अधिकार देण्यात आले व सार्वजनिक उपयोगाच्या निमित्ताने त्याची जमीन कधीही कशीही हिरावून घेण्याचा कायदा करण्यात आला. त्यामुळे शेतीक्षेत्रातील भांडवली गुंतवणूक थांबली व शेतीसाठी लागणा-या मूलभूत सुविधांचा मोठा अनुशेष या क्षेत्रात तयार झाला. एवढेच नव्हे तर या मालमत्तेच्या अधिकार नाकारल्यामुळे या व्यवसायातील कर्ज व पतपुरवठ्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात.  जीवनावश्यक वस्तुंचा कायदा हा अनेक शेतमालाच्या विक्रि, साठवणूक, वाहतूक, प्रक्रिया यावर बंधने आणत शेतक-याला दोन पैसे मिळवून देणा-या संधीपासून दूर ठरवणारा ठरला.
गरिबी हटावसारखे सरकारचे काही आवडते कार्यक्रम शेतीच्या शोषणाला कारणीभूत ठरले आहेत. सार्वजनिक वितरणासाठी लागणारा शेतमाल हा किमान हमी दराने वा लेव्हीसारखी सक्तीची हत्यारे वापरून गोळा करायचा व आपल्या कल्याणकारी योजना राबवायच्या असा काही सरकारांचा परिपाठ होता. साखर व कांद्यासारखे पदार्थ जीवनावश्यक ठरवून सहकारी कारखान्यातून सक्तीचे शोषण करत लेव्हीची साखर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित होत असे. यात उस उत्पादक शेतक-यांचे सरळ आर्थिक नुकसान सिध्द झाले तरी सरकारने ते प्रखर आंदोलने होईपर्यंत मागे घेतले नव्हते. ठराविक कारखान्यांनाच उस घालण्याची सक्ती शेतकऱ्यांनी झोनबंदीचे आंदोलन केल्यानंतर महत्प्रयासाने उठवण्यात आली. आजही कांद्याच्या बाबतीत कुठलेही धोरण निश्चित होत नसल्याने शोषक घटकांना मोकळे रान मिळत पाच पैसे किलोने कांदा विकला जात आहे. निर्यातीतल्या धरसोडीच्या धोरणांमुळे भारत आपली कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावतोय तरी त्याचे कुणाला सोयरसुतक नाही. कापूस एकाधिकारात अशीच कापूस उत्पादकांची लूट करण्यात आली व बाजारातील कापसाची प्रत्यक्ष किंमत कधी शेतक-यांना मिळू दिली नाही. ही सारी धोरणे व व्यवस्था सरकार प्रणित घटकांना शोषण करणे सुलभ व्हावे म्हणूनच आखण्यात येत होती व शेतक-यांचे होणारे नुकसान प्रत्यक्षात दिसत असून देखील सरकारने कधी त्याबाबत संवेदनशीलता दाखवली नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेतील अशा शोषणाचे सर्वाधिक ठळक उदाहरण म्हणजे औद्योगिक विकासासाठी स्वस्त कामगार मिळावेत म्हणून सरकारी धोरणे ठरवून शेतमालाच्या किमती निम्नस्तरावर ठेवण्यात आल्याचे दिसते. याचा उलगडा ज्यावेळी जागतिक व्यापार संस्थेला दिलेल्या लेखाजोख्यात पुराव्यासकट मिळाला तेव्हा भारतीय शेतक-यांना कमी भाव देऊन मिळवलेली एकूण रक्कम ही शासनाने केलेल्या सार्वजनिक उद्योगातील भांडवली गुंतवणुकी इतकीच होती. हा योगायोग होता की शासकीय धोरणातील कठोर वास्तव होते हा भाग बाजूला ठेवला तरी त्याकाळातून शेतीतील भांडवलाचा जो काही ऱ्हास झाला त्याचे पुनर्भरण न झाल्याने आज लाखो शेतकऱ्यांना आत्महत्यांचा उपाय शोधावा लागला आहे.
अशा प्रकारचे शोषण अजूनही अनेक मार्गाने चालू आहे. शेतमालाच्या किंमती ठरवणारा आयोग किती न्याय्य पध्दतीने काम करतो हे त्यांनी ठरवलेले दर व राज्यांनी तशाच प्रकारच्या यंत्रणेद्वारा ठरवलेले दर यांच्यातील तफावतीवरून दिसून येतो. यातील राज्यांनी ठरवलेले दर हे वास्तविक धरले तर त्यानुसार शेतक-यांना जे काही कमी पैसे मिळाले ते लाखो करोडोत जातात. त्या मानाने शेतक-यांवरचे कर्ज नगण्य असले तरी सरकार मात्र कर्जमुक्तीचा विचार करायला तयार नाही. शेतक-यांकडून शोषित रकमेचा वापर सरकारने इतर समाजोपयोगी कारणासाठी केला असता तरी ते क्षम्य होते, मात्र या बचतीचा वापर सरकार आपल्या राजकीय कारणांसाठी आपल्याला मत देण्या-यांचे लांगूलचालन करीत त्या संघटित कर्मचा-यांवर सातवा वेतन आयोग, वा आपल्या आमदार खासदारांचे पगार वाढवत अनुत्पादक कामासाठी करते आहे. ते मात्र अक्षम्य आहे.
शेतीचे शोषण करणा-या अशा या अनेक चोरवाटा, प्रथापरंपरा वा सरकारी कायदे वा धोरणांचे महामार्ग आहेत. या शोषणातून शेतीतील गमावलेल्या भांडवलाचे पुनर्भरण न करता औद्योगिक विकासासाठी साधनसामग्री उभारणे ही राष्ट्रीय आत्महत्या ठरेल. कारण भारतातील निम्मे लोकसंख्या ही स्वतःचेच पोट नव्हे तर देशाचेही भरत, त्याचवेळी निर्यातीत आघाडी घेत कालक्रमणा करते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत तसा सेवाक्षेत्राच्या अचानक वाढीमुळे तसा तुलनात्मक कमी दिसणाऱ्या कृषिच्या वाट्यावर न जाता शाश्वत विकासाच्या व रोजगाराच्या संधी कुठल्या क्षेत्रात असू शकतात हे नियोजनकारांनी बघितले पाहिजे. आज औद्योगिक क्रांतीची बढाई मारणारे चीन सारखे अनेक देश आंतरराष्ट्रीय असंतुलनामुळे कधीही अडचणीत येऊ शकतात. अगदी अमेरिकाही त्याला अपवाद नाही. मात्र या सा-या देशांवर आलेल्या अरिष्टांसारखेच भारतावरही येऊन गेले तरी भारतातील कृषिक्षेत्रामुळे आपण आपली आर्थिक हानि वाचवू शकल्याचे उदाहरण ताजे असूनही आपण त्यापासून काही धडा घेत नाही.
या सर्व गदारोळाचे मुख्य कारण आहे तुमचे सरकार कोणाचे आहे, कुणासाठी काम करते आहे व कसे काम करते आहे हे बघणे. चर्चील एकदा म्हणाले होते, भारत हा दलालांचा देश आहे व ते कधी उत्पादक व ग्राहकांना समाधान मिळू देतील हे संभवत नाही. जपान हा उद्योगी देश आहे, अमेरिका ही उद्योजकांची समजली जाते. जर्मनी, इटली हे तंत्रज्ञांचे देश समजले जातात. या साऱ्या देशांमधील सामाजिक समाधान व समृध्दी बघता भारतात जोवर शेतक-यांचे म्हणजे उत्पादक घटकांचे राज्य येत नाही तोवर जेणो राजा बेपारी, तेणी प्रजा भिकारी या म्हणीचा प्रत्यय व अनुभव घेत शेतीच्या लुटीच्या महामार्गावरून सैर करणे हेच आपल्या हाती उरते.
                                           डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com