Monday, 4 March 2013

भारतीय रेल्वे - शेतमाल बाजाराच्या विकास संधी


नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर चहूबाजूंनी टीका झाली. अर्थात ब-याच अंशी राजकीय हेतुंनी प्रेरित असली तरी एक ठोकळेबाज अर्थसंकल्प ज्यात कल्पनाशक्ती वा दूरदृष्टीचा अभाव हा मुद्दा एकंदरीतच सा-या अर्थसंकल्पाबाबत निरपेक्षपणे नोंदता येईल. नाहीतरी अर्थसंकल्प म्हणजे शेवटी जमाखर्चाची तोंड मिळवणी अशा अर्थानेच घेण्याची प्रथा असल्याने चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळे मांडण्याची जोखीम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतली जाईल अशी शक्यता नव्हतीच. मात्र या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या, विशेषतः शेतक-यांच्या काय अपेक्षा होत्या, त्यांच्या हिताचे काय करणे शक्य होते याचाही विचार व्हायला हवा होता त्याचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही.
मुळात भारतीय रेल्वेचा इतिहास जर बघितला तर इंग्रजांनी तिची आखणी व बांधणी ही भारतीय शेतमाल सहजगत्या सा-या बंदरांपर्यंत कसा वाहून नेता येईल अशा उद्देशानेच केलेली दिसते. महाराष्ट्र, गुजरात व बंगाल यातील रेल्वेचा विस्तार बघता हे लक्षात येते. अहमदनगरच्या ऊसपट्ट्यात त्याकाळी ऊस वाहतूकीसाठी श्रीरामपूर भागात रेल्वेचे जाळे होते. आजही त्या मीटरगेजच्या लाईनी त्या भागात बघायला मिळतात. विदर्भातील बराचसा भाग हा कापूस व कोळसा वाहतूकीच्या निमित्तानेच रेल्वेशी जोडला गेला. त्याकाळी या भागातून प्रवासी वाहतुकीपोटी हे जाळे निर्माण झाले नाही. यावरून शेतमालाच्या वाहतुकीचा संबंध इंग्रजकाळी महत्वाचा होता, कालांतराने प्रवासी वाहतुकीच्या प्राधान्यात विसरला गेला.
या अर्थसंकल्पात धरलेली ५%  वाढ ही प्रवाशांच्या वाढत्यासंख्येमुळे आहे वा महागाईमुळे आपोआपच होणा-या वाढीव महसूलावर आधारलेली असल्याचे निश्चित नसले तरी रेल्वेपुढे असलेल्या आव्हांनाना या तुटपुंज्या जमेचा फारसा उपयोग होईल असे दिसत नाही. उलट माल वाहतुकीचा एक मोठा अनुशेष अजून रेल्वेने विचारातही घेतलेला दिसत नाही. या माल वाहतुकीत शेतमालाचा हिस्सा बघता रेल्वेच्या वाढीव महसुलाबरोबर, खाजगी गुंतवणूक, ग्रामीण विकास, वाढता रोजगार, शेतमालाच्या सक्षम पुरवठा साखळ्या, यातून विकासाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. आज शेतमालाच्या अंतिम भावात वाहतुकीचा खर्च ३० टक्क्यांपर्यत धरला जातो. नाशवंत मालाच्या हाताळणी वा उशीराने होणा-या वाहतुकीमुळे ३० टक्के नुकसान होत असते. दुसरीकडे अशा तत्पर व कार्यक्षम वाहतुक व्यवस्था नसल्याने उत्तम गुणवत्तेचा शेतमाल भरपूर प्रमाणात पिकवून देखील तो उपभोक्त्यापर्यंत पोहचवू न शकल्याने होणा-या नुकसानीचा बोजा शेतक-यांनरच पडत त्याला रास्त भाव मिळण्यात येणा-या अडचणीसोबतच राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रचंड नुकसानीला तो कारणीभूत ठरत असतो. हे सारे नुकसान भरून काढत रेल्वेने शेतमाल वाहतुकीचे नियोजन हाती घेतले तर रेल्वेबरोबर सा-या कृषिक्षेत्राचे चित्रच बदलून टाकता येईल.
आज भारतातील मोठी शहरे वगळता रेल्वेचे सारे जाळे ग्रामीण भागातूनच जात असते. प्रत्येक राज्यातील भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे असलेले भाग निवडून तेथे शेतमाल बाजाराची संकलन, साठवण व वितरण केंद्रे स्थापन करता येतील. यात शीतगृहांच्या साखळ्यांचा समावेश होतो. राज्यातील एकंदरीत शेतमालाची गरज बघता तेवढा माल या साठवणगृहात ठेवता येईल. ज्या राज्यांत टंचाई सदृश परिस्थिती असेल त्यात जवळच्या साठवण केंद्रातून माल पाठवता येईल. यातून कृत्रिम टंचाई वा तेजीमंदीला आळा बसत शेतक-यांना होणा-या बचतीतून रास्त भाव मिळत गेल्याने वाढीव उत्पन्नाचा निर्यातीसाठीदेखील विचार करता येईल. बंदराजवळची सारी साठवण केंद्रे निर्यातप्रवण केली तर त्याचा सरळ फायदा शेतकरी व रेल्वेलाही घेता येईल.
शेतमाल हा हंगामात एकदम तयार होतो व एकदमच बाजारात विक्रीला येतो. साठवण व वाहतुकीच्या अभावामुळे कोंडी होत बराचसा शेतमाल नष्टही होत असतो. या अमाप आगमनामुळे संघटित व्यापारी शेतमालाचे भाव पाडतात व एकदा का माल हाती आला की भाववाढीला सुरूवात करतात. रेल्वेने स्वतः वा खाजगी सहभागानी साठवण केंद्रे काढली तर शेतातून माल तयार होण्याच्या अगोदर तो कुठल्या साठवण केंद्रात पाठवायचा याचे नियोजन करता येईल. केंद्राने अलिकडेच पारित केलेल्या शेतमाल वखार कायद्याची मदत घेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटनुसार शेतक-यांना पुरवलेल्या मालाच्या ७५%  अग्रीम रक्कम देत पूर्ण विक्री झाल्यावर शेतक-यापर्यंत बाजारात मिळालेला नफा पोहचवता येईल. यात सध्या होत असणारे दलाली. आडत, हाताळणी व वाहतूक व्यवस्थेतील सुमारे ६०% बचत होत असल्याने यातील सर्व घटकांना पुरेसा नफा होईलच याची निश्चिंती आहे.
दुसरा एक महत्वाचा मार्ग म्हणजे सा-या मोठ्या शहरातील प्रमुख शहरे वा उपनगरीय स्थानके यांच्यावर शेतमालाची किरकोळीची दुकाने टाकता येतील. या स्थानकांवरून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सध्या होत असणारी शेतमालाची कोंडी सहजगत्या फोडता येईल. म्हणजे लासलगावला कांदा ५ रूपये व ४० किमीवरच्या नाशिकला तोच कांदा २० रूपये असे विरोधाभासी चित्र पहायला मिळणार नाही. जी गोष्ट कांद्याची तीच जळगावच्या केळ्यांची, नाशिकच्या द्राक्षांची, कानपूरच्या बटाट्याची, हिमाचलच्या सफरचंदाची तर अरूणचलच्या अननसाची. पंजाबच्या गव्हाची, केरळच्या नारळाची तर बंगालच्या भाताची. उत्पादनाच्या दृष्टीने एवढा समृध्द देशात केवळ व्यवस्थेच्या अनास्था वा अभावापोटी शेतक-यांना त्यांच्या उपजिवुकेच्या हक्कांपासून वंचित रहावे लागत असेल तर तो आपल्या कल्पनाशक्ती वा दूरदृष्टीचाच पराभव आहे असे मान्य करावे लागेल.
यात लागणा-या गुंतवणुकीचा विचार करता सरकारने शेतीसाठी जाहीर केलेली पॅकेजेस, जी आजवर शेतक-यांपर्यंत न पोहचता भ्रष्टाचारातच लुप्त झाली, ती रक्कम या योजनेत भाग घेऊ इच्छिणा-या शेतक-यांच्या नावाने बीज भांडवल म्हणून वापरावी व शेतक-यांना सभासद करून घेत त्यांना त्याचे सहभाग द्यावेत. या योजनेला होणा-या फायद्यातही सहभागी शेतक-यांना लाभ देता येईल. या योजनेत खाजगी गुंतवणुकीला आकर्षित करणारे अनेक घटक असल्याने सरकारने यात फारशी लुडबूड न करता प्रगत तंत्रज्ञान, अत्यानुधिक व्यवस्थापन व ग्रामीण युवकांचा रोजगारात सहभाग ठेवला तर आज रेल्वेच्या फायद्यासह आपल्याला भेडसावणा-या महागाईसारख्या अनेक कलुपांना उघडणारी ती गुरूकिल्ली ठरू शकेल.
                                                डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com  

Tuesday, 18 December 2012

पण लक्षात कोण घेतो ?


पण लक्षात कोण घेतो ?
नाशिकमधील शहर वाहतुकीच्या संदर्भातील नो पार्कींग या सदरात प्रसिध्द झालेल्या संबंधित अधिका-यांच्या प्रतिक्रिया या वर्षानुवर्षे त्याच असून सर्वसामान्य वाचकांच्या तर पाठ झाल्या आहेत. दरवेळी अधिका-याचे नाव व छबी बदलते एवढेच. एवढ्या वर्षांपासून नागरिकांना छळणा-या या समस्येवर या बोलघेवड्या यंत्रणेला आजवर काही मार्ग सापडू नये याचाच अर्थ ही यंत्रणा अक्षम आहे, वा या यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले आहे, वा या यंत्रणेला काही करायचेच नाही आहे असा काढता येऊ शकतो. वास्तवात या तिन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. शहरातील सा-या उग्र स्वरूप धारण केलेल्या समस्यांबाबत शासन यंत्रणेचे संबंधित अधिकारी आपले काम काय आहे हे नेमके विसरून समस्येचा चेंडू एकमेकांच्या यार्डात टोलवत रहातात. ही टोलवाटोलवी यशस्वीरित्या करणा-या अधिका-याला कर्तव्यदक्ष व कार्यक्षम असल्याचे समजले जाते.
वास्तवात हे सिस्टीम फेल्युअर हे अधिकारीच नव्हे तर शासनाच्या हाताबाहेर गेलेले प्रकरण आहे. आजच्या शासन व्यवस्थेची कार्यपध्दती व प्राथमिकता लक्षात घेता अशा भाकड मुद्यावर एरवी फलप्रद ठरणारा मोल्यवान वेळ वाया दवडतील असे वाटत नाही. पत्रकारांना ठसेछाप प्रतिक्रिया देऊन झाल्या की आपले काम संपले या अविर्भावात ही व्यवस्था काम करीत असते. नोकरीत रहाण्याचे यांचे उद्देश हे इतके किळसवाणे असतात की नको त्यांच्या नादी लागायला अशा भावनेने सर्वसामान्य माणूस त्याचे भोग भोगत कालक्रमण करीत रहातो.
आता महामगरपालिकेचेच घ्या. पार्कींगसाठी जागेची व्यवस्था ही विकासकाने करायची असते हे ते सांगत रहातात. मात्र अशा विकासकांवर आजवर काय कारवाई केली याबद्दल त्यांना बोलता येत नाही. एवढेच नव्हे तर महानगरपालिका झाल्यानंतर शहर विकासाचे सारे नियम न निकष लागू झाल्यानंतर असे चुकीचे आराखडे मंजूर करणा-या अधिका-यांवर काय कारवाई केली याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. कदाचित अशी एकादी जरी सक्षम कारवाई एकाद्या विकासकावर व नगर रचनाकारावर झाली असती तर एवढा काट्याचा नायटा झालाच नसता. दरवेळी शोध चालू आहे, अभ्यास चालू आहे अशा वेळकाढूपणामागे हे भयाण वास्तव असल्याचे लक्षात येते.
आरटीओ खात्याचे तर विचारू नका. एवढ्या मोठ्या इमारतीत एवढे सारे अधिकारी दिवसभर नेमके काय काम करतात हे शोधून काढणा-याला मोठे बक्षिस मिळेल. शहरातील मोकळ्या व वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील जागा अडवणा-या २४००० हजार रिक्षा आज विनापरवाना धावत आहेत. यात वैध परवाना धारकांच्या उपजिविकेच्या अधिकारावरील अतिक्रमणाबरोबर वाढती गुन्हेगारी व शासनाचा बुडणारा महसूल याचा गंभीर प्रश्न या खात्याच्या लक्षात कसा येत नाही याचेच आश्चर्य वाटते. या बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई करण्याचे अधिकार आरटीओचेच असून त्यांना ही जबाबदारी झटकता येणार नाही. एवढ्या प्रचंड संख्येच्या गर्दी करणा-या रिक्षा हटल्या तर नाशिकची वाहतुक व पार्कींगचा प्रश्न बराचसा सुसह्य होऊ शकेल.
पोलिसांचे तर विचारायला नको. अंगावर वर्दी आहे म्हणून त्यांना पोलिस म्हणायचे एवढेच. अन्यथा तेही सामान्य नागरिकांसारखेच स्वतःचे अधिकार व ताकद विसरून स्वतःला हतबल समजायला लागले आहेत. सामान्य नागरिकांची वाहने उचलतांना जेवढी कार्यतत्परता दाखवतात, वा सर्वसामान्यांना ज्या भाषेत त्यांचा उध्दार करून त्यांना कायदा शिकवतात त्याच तत्परतेने व नम्रतेने ते शहरातील रिक्षावाल्यांसमोर नांग्याही टाकतात. नो पार्कींगचा कायदा सर्वसामान्यांसाठीच आहे, रिक्षावाल्यांसाठी नाही असा त्यांचा समज आहे. पोलिसांनी रिक्षावाल्याकडून मार खाणे हे आपले रक्षणकर्ते आहेत या समजाला छेद देणारे असल्याने सर्वसामान्यही पोलिसांना आताशा फार गंभीरतेने घेत नाहीत. ब-याचशा पार्कींगच्या समस्या या वाहतुकीत अडथळा आणणा-या जागांवर वेकायदेशीर रिक्षा थांब्यामुळे निर्माण होतात हे आपण सारे रोज बघत असूनही या यंत्रणेला दिसत नसावेत याचे आश्चर्य वाटते.
म्हणूनच हे सिस्टीम फेल्युअर आता सा-यांच्या हाताबाहेर गेले आहे. या यंत्रणेला आपले विहित काम करायला भाग पाडणे वा नशीबी आलेले भोग भोगत रहाणे हे दोनच पर्याय सध्यातरी दिसताहेत. सामान्य नागरिकांची उदासिनता व व्यवस्थेची मस्ती या महत्वाच्या घटकांवर जोवर काम होत नाही तोवर अशा वृत्तपत्रातील जागा वाया घालणा-या ठसेछाप प्रतिक्रिया वाचत रहाणे हाच यातला मतितार्थ !!
                                                     डॉ.गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com  

Tuesday, 20 November 2012

दिवाळीनंतरचे दिवाळे !!



सण कसाही, केव्हाही आला तरी मोठा असल्याने त्यात आनंदाला कधीच तोटा नसतो असे आपल्याकडे मानण्याची पध्दत आहे. मग ऐपत नसली तरी इतरांना दाखवण्यासाठी का होईना ऋण काढून सण साजरा करायची वेळ येते. सणाला काढलेले ऋण हे या किंवा पुढच्या हंगामात निश्चित फेडता येईल याची कुठलाही शाश्वती नसतांना केवळ काळ्या आईच्या भरवशावर सारा शेतकरी समाज एकेक वर्ष पुढे ढकलत असतो. खरे म्हणजे शेतक-यांनी ठरवले तर तो बारोमास दिवाळी साजरी करू शकतो कारण या विश्वात उत्पादन केवळ त्याच्याच उद्योगात होते तेही सा-या जगाच्या मूलभूत गरजांपैकी भूक या महत्वाच्या गरजेशी निगडीत आहे. सर्व जगाची सत्ता नियंत्रित करू शकणा-या या शेतक-याची शक्तीस्थळे एवढी प्रबळ असतांना त्याच्यावर जगणेच मुष्कील होऊन आत्महत्या करण्याची पाळी याचाही गंभीर विचार दुसरेतिसरे कोणी करणार नसून या समाजातील जाणकार मंडळींनाच करावा लागणार आहे.
दुर्दैवाने आज गावात ज्यांना आपण जाणकार समजतो ते एकतर या व्यवस्थेला शरण जात हतबल झालेले दिसतात. यात सामूहिक हितापेक्षा व्यक्तीगत लाभाचाच विचार असतो. सत्तेचे लाभ पदरात पाडत काही चाणाक्ष मंडळी सा-या गावाला वेठीस धरत असतात. बाहेरच्या राजकारणाला बळी पडत सा-या गावातील वातावरण गढूळ करीत गाव म्हणून एकसंघ वा एकविचाराचा समूह ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. समजदार वर्ग असा अडकलेला तर तरूणांना योग्य दिशा देणारे नेतृत्व नाही. जे समोर येईल त्याला राजकारण म्हणत वहावत जायचे व कुणाच्या तरी हाताचे बाहुले होत, की जय वा झिंदाबादच्या घोषणा देत स्वतःला कृतकृत्य मानून घ्यायची वेळ आज या ग्रामीण तरूणांपुढे आली आहे. त्यांचे आदर्शही प्रस्थापित व्यवस्थेतीलच असतात. त्यांच्या विचार व प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेपेक्षा तो कोणाचा कोण यावरच सारे ठरत असते. अशा स्वीकारलेल्या नेतृत्वाकडून शेतक-यांचे ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्ष का सोडवले जात नाही वा त्यांच्या कडून अशी अपेक्षाही केली जात नाही यातच सारे आले. प्रस्थापितांची एवढी पकड या व्यवस्थेवर आहे की कुठलाही नवा विचार वा परिवर्तनाच्या शक्यता दिसू लागताच त्याला नामोहरण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले जातात, प्रसंगी दहशतीचा वापर होत नसल्याने नव्या विचारांचे अस्तित्वच ग्रामीण भागात धोक्यात आले आहे. ज्यांनी नवा विचार सामूहिक पातळीवर स्वीकारता आला नसला तरी वैक्तीगत पातळीवर स्वीकारल्याने अशी परिवर्तनाची वा विकासाची बेटे ग्रामीण भागात दिसतात. निदान त्यांचा आदर्श घेत आपणही त्या दिशेने जावे असे सर्वसामान्य समाजाला का वाटत नाही हा समाजशास्त्रिय प्रश्न अभ्यासावा लागणार आहे.
आज शेतीच्या प्रश्नांचे जे काही कडबोळे झाले आहे ते प्रामुख्याने राजकीय व आर्थिक स्वरूपाचे आहे. शेतक-यांच्या सामाजिक जीवनातील जातपात निवडणुक काळात अडचणीची ठरत असली तरी घराणेशाही हाही मोठा रोग ग्रामीण राजकारणाला लागला आहे. या सा-या समस्यांचा उहापोह प्रामुख्याने राजकीय व आर्थिक दृष्टीकोनातून केला तर त्याची उकल होऊ शकेल, मात्र त्यासाठी वास्तविकता, वस्तुनिष्ठता, व्यापकता व बंडखोर प्रवृत्ती असेल तरच सध्याच्या व्यवस्थेच्या मगरमिठीतून बाहेर पडता येईल. यासाठी शेतक-यांच्या तरूण मुलामुलींचा वर्ग आदर्श असून निदान या वर्गानी एकत्र येत गाव पातळीवर आपल्या प्रश्नांचा अभ्यास व चर्चा सुरू केल्या तर या दिशेने जाण्याचा स्तुत्य प्रयत्न ठरू शकेल. आपण आजवर या सदरातून केलेल्या सा-या चर्चांना तरूण शेतक-यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सा-यांच्या मनात काहीतरी करावे वा काहीतरी व्हावे असे प्रकर्षाने वाटत असते. मात्र त्याची सुरूवात कशी व कुठे करावी हे होत नसल्याने अडकल्यासारखे वाटते आहे. हे सारे कसे करता येईल याचे विवेचन पुढच्या बुधवारी !!
                              डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९  

Wednesday, 14 November 2012

बलिप्रतिपदा



बलिप्रतिपदा !!
काळ्या आईच्या गर्भातून तरारून आलेल्या सा-या निसर्ग सृजनतेचा अविष्कार व त्या निर्मितीचा सोहळा म्हणजे बलिप्रतिपदा. या सृजनतेची पिढ्यान पिढ्या धुरा वाहणा-या शेतक-यांचा पूर्वज ‘बळी’  हा कधीकाळी शेतक-यांचा राजा होता आणि केवळ राज्यच नव्हे तर सारा कृषिधर्म काय असावा, कसा असावा याचे समग्र तत्वज्ञान त्याकाळी प्रचलित व्यवस्थेचा प्रखर विरोध झुगारत मांडले जात होते हे सारे रोमहर्षकच नव्हे तर चित्तथरारक देखील आहे. आज सा-या व्यवस्थेत हतबल व अडगळ ठरलेला शेतकरी कधीतरी त्याचे स्वतःचे राज्य होते, त्याची धुरा वाहणारा कर्तबगार ‘बळी’ हा त्यांचा राजा होता व आज कुठलाही मूगमास नसलेले त्याच्या जीवनशैलीचे एक स्वतंत्र तत्वज्ञानही या कर्मयोगी समाजाला समृध्द करीत श्रमसंस्कृतीला जगण्याचे एक समर्पक आयाम व प्रतिष्ठा देत अस्तीत्वात होते याची आठवण देखील या सा-या समाजाला एक नव्या आशेची, उभारीची झेप घेण्यास पुरेशी आहे.
कुठल्याही समाजाची जडणघडण वा मानसिकता ही त्यात पेरलेल्या व जोपासल्या जाणा-या विचार व मूल्यांवर वर अवलंबून असते. विचार व आचार हे परस्परावलंबी असतात व विचारातून आचार व आचारातून विचार असे हे चक्र अव्याहतपणे चालत असते. कधीकाळी निसर्गाशी झुंजणारा हा लढाऊ वास्तववादी समाज आपली समाजमूल्ये विसरत कसा दैववादी संस्कारांचा बळी ठरत गुलामगिरीच्या जोखंडात बध्द होत आजच्या परिस्थितीला येऊन ठेपला याचा इतिहास खरोखरच अभ्यासण्यासारखा आहे. तमाम शेतकरी समाजाच्या दृष्टीने आजची ही बलिप्रतिपदा खरे म्हणजे बळीच्या स्मृतीचा दिन न रहाता दिव्यांचा सण म्हणून साजरी होते, त्यात बळीच्या विचाराचा, आचाराचा कुठेही मागमूस दिसत नाही एवढे निरिक्षण या सा-या समाजाला आत्मपरिक्षण करायला पुरेसे आहे असे वाटते.
इतिहास वा भूतकाळातील हे सारे संदर्भ हे नव्या परिप्रेक्ष्यात ओझे म्हणून न समजता या सा-या शृंखलेत नेमके काय चुकले याचा परामर्ष जर घेता आला तर आजची झालेली कोंडी वा हतबलता यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडतो का यादृष्टीनेही त्याचे वेगळे महत्व आहे. शेती हे केवळ भांडवल, श्रम वा उत्पादनाशी निगडीत आहे की निसर्गातून मिळणा-या अलोट उर्जांच्या स्त्रोतांशी संबंधित असलेली जीवनपध्दती आहे याचा पुनर्विचार यासाठी करण्याचे महत्वाचे आहे की आताशा मानवाच्या सा-या सुखाचे व समाधानाचे इंडेक्स आता भौतिक परिमाणापेक्षा मानसिक परिमाणाशी निगडीत होताहेत आणि यात प्रत्यक्ष उत्पादनाच्या वापरातून मिळणा-या लाभापेक्षा उत्पादन प्रक्रियेतच असे काही आहे का ते सुखासमाधानाचा स्त्रोत ठरू शकेल, तेही निसर्गाच्या संमती, सानिध्य वा संलग्नतेने हे पहाणे औसुक्याचे ठरेल.
तत्वाज्ञानाची पार्श्वभूमी असलेली ही मांडणी सर्वसाधारण शेतक-यांना काहीशी क्लिष्ट वाटण्याची शक्यता असली तरी सा-या शेतकरी समाजाने आपल्या सा-या विचारधारा, संकल्पना, धारणा यांच्याबरोबर व्यावहारिक वास्तवतेचे भान राखत आपले सामाजिक आचार विचार ठरवले पाहिजेत. केवळ परंपरा, रूढी आहेत म्हणून त्या पाळल्याच पाहिजे असे भाकड ओझे बाळगण्याचे कारण नाही. असे नियंत्रित वर्तन हे गुलामगिरीचे द्योतक असते व स्वातंत्र्यवादी विचारांसाठी ते एक प्रमुख अडथळा ठरत असते हे लक्षात घेतले पाहिजे. सुदैवाने या सा-या शेतकरी समाजात महात्मा फुले ते गावोगावी वेड्यात काढलेले अनेक बंडखोर विचारवंत अस्तीत्वात असलेले दिसतील. या सा-या गावातील पागल ठरवलेल्या बंडखोरांचे निदान ते काय म्हणतात हे ऐकून घेण्याची सोय जर झाली तर स्वाध्दौरासाठी कुठेही जाण्याची या समाजाला गरज नाही. गेल्या अनेक शतकांपासून गाडलेल्या या बळीराजाला असूनही आपल्या पुनरागमनाची संधी मिळत नसल्याने त्याचे तमाम वंशज यावर काय ठरवतात वा गंभीर होतात त्यावर ते सारे अवलंबून आहे.
                                 डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९   

Friday, 19 October 2012

साखर गोड, पण कुणासाठी ?



पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेल्या रंगराजन यांनी साखर विनियंत्रण धोरण कसे असावे याबद्दलच्या काही सूचना सरकारला सादर केल्या आहेत. तसे हे सारे सुधार अचानक बाहेर येण्याच्या वेळेलाच याही सूचना आल्याने सरकारला खरोखरच या क्षेत्रात काही घडवून आणायचे आहे की आपल्यावर होत असलेल्या धोरण लकव्याच्या आरोपाला उत्तर द्यायच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे हे कळत नाही. किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणुकीचा निर्णय नुसता जाहीर होताच जो काही धुराळा उडाला त्यावरून जणू काही सा-या सुधारांना लगेचच सुरूवात होणार आहे असा आभास सा-यांना होऊ लागला आहे. प्रत्यक्षात मात्र एफडीआय प्रमाणेच रंगराजन समितीच्या शिफारशी प्रत्यक्षात अमलात येण्याच्या शक्यता धूसर ठरू शकतात कारण आताशा साखर विनियंत्रणाच्या बाबतीत विचार करण्याची ही चौथी वेळ आहे व या अगोदरच्या तीन समित्यांच्या शिफारशी राजकीय विरोधामुळे स्वीकारण्यात आलेल्या नव्हत्या हे वास्तवही नजरेआड करून चालणार नाही.
यावेळी साखर विनियंत्रणाची शक्यता थोडी वाढल्यासारखी वाटते कारण त्याला विरोध करणा-या सहकारी क्षेत्राची झालेली गलितगात्र अवस्था व सहकारात स्वारस्य असणा-यांच्या दृष्टीने, हे क्षेत्र आपल्याच कर्माने भाकड झाल्याने, या चिपाडातून आता काय मिळणार या मानसिकतेतून हे सुधार स्वीकारले जातील. ऊस व साखर या दोघांपैकी बाबतीत साखर या पक्क्या मालाचे सुधार तत्परतेने स्वीकारले जातील, कारण त्याचा सरळ संबंध साखर उद्योग व व्यापाराशी आहे. असंघटीत व दूर्बल शेतक-यांच्या ऊसाचे भाव ठरवण्याचा भाग तसा क्लिष्ट असल्याने त्यावर विवाद उभा राहून त्यातल्या त्यात सहकारी क्षेत्राच्या पदरात काही टाकता येते का याचा विचार केला जाईल. या सा-या निर्णयावर साखर क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने आरूढ झालेल्या खाजगी साखर कारखानदारीचा मोठा प्रभाव असल्याचे दिसते. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सहकारी साखर प्रक्रिया उद्योगाच्या या संरचना भ्रष्टाचार व गलथानपणामुळे डबघाईस असल्याने त्यांचेही खाजगीकरण होऊ लागले आहे.  
या शिफारशींचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला म्हणजे साखर विक्रीवर असलेले सरकारचे नियंत्रण हटवण्याचा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी सरकार कारखान्यांच्या उत्पादनातून १० टक्के साखर नियंत्रित भावाने लेव्हीच्या स्वरूपात घेत असल्याचा एक व दुसरा म्हणजे उसाला मिळणा-या भावाचे निश्चित असे समीकरण ठरवण्याचा. याच बरोबर साखरेच्या आयातनिर्यातीवरील बंधने हटवणे व ऊस आरक्षण व दोन कारखान्यातील अंतरासारखे दुय्यम मुद्देही यात समाविष्ट आहेत. या सर्व बाबतीत जाणवत असलेल्या अनेक अन्यायकारी व विरोधाभासी तरतुदी अनेकवेळा शेतकरी, उद्योग व बाजाराकडून वेळोवेळी मांडल्या गेल्या आहेत. त्यावरच्या चर्चाही अनेक वेळा झालेल्या आहेत. आता प्रश्न फक्त अंमलबजावणीचा आहे, त्यात सरकार नेमके काय करते यावर सरकारची भूमिका लक्षात येईल.
भारतीय शेतमाल बाजार हा सरकारी हस्तक्षेपाचा प्रमुख बळी ठरला आहे. काही क्षेत्रात निर्माण झालेला एकाधिकार हा कालबध्द कार्यक्रमातून संपुष्टात आणावा ही जागतिक व्यापार करारातील महत्वाची अट आहे. जगातील दुस-या क्रमांकाचा साखर उत्पादक असलेल्या देशात साखरेचे भाव वाढतील या भितीने सा-या उत्पादनावरच सरकारचे नियंत्रण असल्याने बाजारात येणा-या साखरेच्या किमतीवर त्याचा परिणाम होत उत्पादक शेतक-यांना त्यांच्या विहित मोबदल्याच्या हक्कांपासून दूर ठेवण्यात येत आहे. अर्थशास्त्रीय संकल्पनेनुसार उत्पादनाचे भाव ठरवण्याची योग्य जागा ही बाजार आहे व हा बाजार जेवढा मुक्त असेल तेवढा तो उत्पादक व ग्राहक यांना न्यायकारक असतो. साखरेच्या किंमती शेवटी या मागणी व पुरवठा यावरच ठराव्यात हा एक महत्वाचा भाग या निमित्ताने ऐरणीवर येतो आहे. ठराविक काळाने साखर विक्रीचा कोटा नियंत्रतीत करण्यामुळे लायसन-परमीट-कोटा, मागणी व पुरवठ्यात येणारी कृत्रिम तेजी मंदी, साठेबाजी, साखर कारखान्यांवर पडणारा भांडवली बोजा, साठवणुकीचा खर्च, त्यातील घट व त्यातून मिळणा-या काळ्या बाजाराला प्रोत्साहन हे सारे लक्षात घेता हे नियंत्रण हटणे आवश्यक आहे.
या शिफारशींमधील महत्वाचा भाग म्हणजे सरकार आपली जबाबदारी मानणा-या सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साखर कारखान्यांच्या उत्पादनाच्या दहा टक्के भाग नियंत्रित दराने लेव्हीच्या स्वरूपात घेत असते. यात शेतक-यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या मोबदल्यातील तफावत जी जवळ जवळ ३३०० कोटींची आहे, ती शेवटी शेतक-यांवरच पडते व त्याचे पर्यावसान तेवढा ऊसदर कमी मिळण्यात होते. कारण ऊसाचा दर हा शेवटी कारखान्यांना मिळणा-या साखर विक्रीतूनच मिळत असतो. ही लेव्ही जर बंद झाली तर तेवढी मोकळीक कारखान्यांना मिळू शकेल. ती शेतक-यांपर्यंत पोहचेल याची मात्र निश्चिंती नाही.
शेतक-यांना मिळणा-या ऊसदराबाबत मात्र या समितीचा गोंधळ उडालेला दिसतो. तो अनाहूत आहे वा बनाव आहे हे लक्षात येत नाही. कारण कारखान्याला मिळणा-या नफ्यातून शेतक-यांना ७५ टक्के द्यावेत असा हा प्रस्ताव आहे. मात्र कारखान्यांचे उत्पन्न हे कारखान्यांच्या कन्व्हर्शन कॉस्टवरच अवलंबून असते याकडे दूर्लक्ष करून कारखान्यांना पूर्ण मोकळीक देत उरलेल्या पैशांतून ७५ टक्के शेतक-यांना मिळणार आहेत. कारखान्यांच्या कन्व्हर्शन कॉस्टची या समीकरणात काय भूमिका आहे याकडे पूर्णतः दूर्लक्ष झाले आहे. संपूर्ण देशात एकच धोरण असतांना काही कारखाने १४०० भाव देतात, त्याचवेळी त्याच भागात, त्याच हंगामात त्याच उता-याच्या ऊसाला काही कारखाने २४०० भाव देऊ शकतात, यातली मेख शोधण्यात ही समिती अपयशी ठरली आहे असे वाटते. म्हणूनच ७५ टक्क्यांसारखी विवादांना आमंत्रित करणारी तरतूद सूचवली गेली का याची शंका येते. परत यात एफआरपी व उपपदार्थांच्या विक्रीतून येणा-या उत्पन्नांची सांगड अव्यावहारिकरित्या घातली आहे. यात मुख्यत्वे सहकार क्षेत्राचा समावेश असल्याने अशा भोंगळ तरतुदींना वाव मिळतो. मुळात हे कारखाने शेतक-यांचे आहेत व त्यांनी उत्पादित केलेल्या साखरेतून त्यांच्या ऊसाला पैसे मिळवेत ही फसवी संकल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे. शेतकरी कारखान्याचा सभासद असणे ही वेगळी बाब व तो ऊस उत्पादक असणे ही दुसरी बाब. यात गल्लत करता कामा नये.
साखर कारखाने मग ते सहकारी असोत वा खाजगी, याच्याशी शेतक-यांना काही देणे घेणे नाही. भले मी दैवसंयोगाने एकाद्या कारखान्याचा सभासद असलो तरी माझ्या नियंत्रणात नसलेल्या आर्थिक निर्णयांमुळे मी या कारखान्याचा कमी भाव स्वीकारावा असे मांडणे म्हणजे माझी फसवणूक आहे. जो कारखाना मला कमाल भाव देईल हे माझी शेती फायदेशीर असण्यासाठी आवश्यक असल्याने तसा निर्णय घ्यायला मी स्वतंत्र असलो पाहिजे. मला आवश्यक तो भाव मिळाल्यानंतर त्या साखर, उपपदार्थ व त्यातला नफातोटा हा संपूर्ण त्या कारखान्याची जबाबदारी असली पाहिजे.
एकंदरीत शेतक-यांच्या हिताच्या हे सुधार आहेत असे भासवले जात असले तरी अत्यंत चाणाक्षपणे कारखाने व व्यापार क्षेत्रालाच यात झुकते माप मिळाल्याचे दिसते आहे.
                                                      डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com  

Friday, 12 October 2012

चष्मा नव्हे, दृष्टीही बदला !!


चष्मा नव्हे, दृष्टीही बदला !!
जंतर मंतरवरील उपोषणाची सांगता शेवटी राजकीय पर्याय देण्याच्या निर्णयात झाली. या शक्यतेचे सूतोवाच दै. लोकसत्तातील २० जूलैच्या ‘भ्रष्टाचारा विरोधात लढणा-यांनी आपल्या त्रुटी ओळखाव्यात’ या लेखात व्यक्त करतांनाच या पर्यायातील काठिण्य, धोके व कमतरता यांचाही उल्लेख केला होता. त्यावरील मुद्यांचा आज होणा-या सा-या चर्चांमध्ये समावेश होत असला तरी या निर्णयावर टीका करतांना वा स्वागत करतांना आपल्या पारंपारिक वैचारिक चौकटीचाच आधार घेतला जात असल्याने या नव्या वाटेवर नेमके काय वाढून ठेवले आहे याचा परामर्ष घेण्यात अडथळे येतील हे मात्र नक्की.
आजही ही सारी चर्चा अण्णांभोवतीच गिरवतांना अण्णा टीम, अण्णा राजकारणात येणार, अण्णा पक्ष काढणार, अशा अण्णाकेंद्रित मुद्यावरच एकवटते आहे. त्याचबरोबर राजकारणात येणे म्हणजे काहीतरी महाभयंकर महापातक आहे असाही सूर लागला आहे. राजकारण हे राजकारण असते व ते चांगले की वाईट हे तुम्ही कुठे आहात यावर ठरते. लोकशाहीत तर ते आवश्यक वा अनावश्यक याच्या चर्चाही फोल ठरतात. याबाबतच्या व्यक्त होत असलेल्या काही भूमिका या पटल्याने उस्फूर्त असतात तर काही भूमिका पटत नसूनही काही अपरिहार्य कारणांमुळे घ्याव्या लागलेल्या दिसतात. आजच्या भीषण व प्रत्यक्ष अनुभवातील राजकारणाबद्दल फारशी तक्रार न करता येऊ पहाणा-या शक्यतांबद्दल एवढा कोलाहल मात्र अनाकलनीय वाटतो. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा एकांगी व निश्चित झाल्याने अशा झापडबंद प्रतिक्रिया येत असतात.
या सा-या चर्चांमध्ये प्रामुख्याने अण्णांच्या आजवरच्या वाटचालीचा लेखाजोखा, त्यांच्या क्षमता वा मर्यादा यावर या नव्या पर्यायाचे भवितव्य वर्तवले जात आहे. हे आंदोलन येथपर्यंत येण्यात अण्णांचा वाटा, सहभाग वा अधिकार कोणीही नाकारणार नाही, परंतु या व्यतिरिक्तही या आंदोलनाच्या बाहेर न आलेल्या काही बाजू आहेत, परिवर्तनाच्या दिशा व शक्यता याबाबतीत एक नवा पल्ला गाठलेला असतांना त्या नेमक्या काय आहेत त्यांच्याकडे या महत्वाच्या क्षणी दूर्लक्ष होते आहे असे वाटते.
अण्णांच्या महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी चळवळी बरोबर भारतात अनेक ठिकाणी भ्रष्टाचारा विरोधात लहान मोठी, व्यक्तीगत वा संस्थांत्मक पातळीवर आंदोलने, चळवळी, लढे चालू होते. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधाला ग्राम विकासाची जोड लाभल्याने व त्यांच्या साधेपणामुळे महाराष्ट्रभर ही चळवळ उभी राहिली. काही वेळा सैध्दांतिकरित्या वेगळे वाटत असून सुध्दा महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा व त्याबद्दलची त्यांची कळकळ, प्रामाणिकता बघून त्यांना पाठिंबा दिला आहे. आजही ब-याच लोकांना (त्यांच्या दृष्टीने) अण्णांच्या चूका दिसत असून देखील त्यांना जाहिर विरोध करावा वा ते अप्रिय वाटावेत असे घडत नाही. थोड्याफार याच पध्दतीने ठिकठिकाणी असे काम करणा-या कार्यकर्त्यांना आपल्या क्षमता, मर्यादा यांचे भान येत असतांनाच देशव्यापी आंदोलनाची गरज भासू लागली व सिनर्जीच्या तत्वानुसार आपल्या क्षमता-मर्यादा, गुणदोषांची सरमिसळ होऊन एक नवी ताकद निर्माण करण्याचा प्रवास व प्रयास आपण सर्वांनी पाहिला आहे.
या आंदोलनात सक्रिय असलेली मंडळी प्रचलित अर्थाने राजकारणी म्हणून प्रसिध्द नसली तरी राजकारण नेमके कसे असावे याचा सांगोपांग विचार करून एक नव्या राजकीय संस्कृतीचा विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक नवी भाषा ते बोलू लागले आहेत. त्यांचे हेतुही सध्याच्या राजकारण्यांपेक्षा वाईट आहेत असे दिसलेले वा सिध्द झालेले नाही. त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे हा त्याच्यावरचा आरोप हास्यास्पद आहे. अशी महत्वाकांक्षा कशामुळे वाईट समजायची हे ते आरोप करणारेच जाणोत. निवडणुका केवळ आम्हीच जिंकू शकतो असा आत्मविश्वासी पवित्रा घेणा-या पक्षांना आपल्या या समजाचा पुर्नविचार करायला लावू शकेल अशी परिस्थिती आहे. नवा तरूण मतदार जो पाखंडीपणाच्या विरोधात असतो असा राजकीयच नव्हे तर अनेक पालकांचा स्वानुभव आहे. या पाखंडामुळेच एवढा मोठा वर्ग राजकारणापासून फटकून वागत असल्याचे दिसतो. हा सारा वर्ग या आंदोलनाच्या स्वच्छ व पारदर्शी विचारांना पाठींबा देत असल्याचे या आंदोलनात दिसून आले आहे. हेही या आंदोलनाचे यशच समजले पाहिजे. आपल्या पारंपारिक व्होट बँका वा अलोकशाही पध्दतीने मिळवलेल्या मतांचे प्रमाण या बदलत्या वातावरणात जेथे माहिती व विचाराचा भडिमाराने प्रसार करणारी प्रगत तंत्रज्ञानी माध्यमे व जनतेचा या सा-या व्यवस्थेप्रती असलेला स्वानुभव या नव्या परिमाणांमुळे बदलणार आहे हा या आंदोलनाने मिळवलेला मोठा टप्पा आहे.
देशपातळीवर या भ्रष्टाचाराच्या मुद्याला अग्रस्थानी नेऊन त्याला सर्वसामान्यांचे केवळ समर्थनच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील आपण या सर्वशक्तीमान व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपून उभे राहू शकतो या सक्षमीकरणापर्यंत या आंदोलनाने मजल गाठली आहे. एरवी यवतमाळसारख्या खेड्यातील एक शेतकरी महिला, ‘येऊ दे त्या मंत्र्याला मग बघते’ असे जाहिररित्या बोलू शकली नसती. थोडक्यात एरवी आपल्याच मस्ती व गुर्मीत वावरणा-या या सत्ताधा-यांना कट टू साईज करण्याचे महत्वाचे काम या आंदोलनाने केले आहे. माहितीचा अधिकार व जनतेत येणारी ही जागरूकता ही गाव, तालुका वा जिल्हा पातळीवर सामान्यांच्या सहभागाने दिसू लागली आहे. लोक व्यवस्थेला प्रश्न करू लागले आहेत, माध्यमेही धीट होत एकापाठोपाठ भ्रष्टाचाराची महाकाय प्रकरणे काढू लागली आहेत. एकंदरीत सहभागी लोकशाहीच्या दिशेने पडणारे हे पाऊल आंदोलनाला अभिप्रेत असलेल्या नव्या राजकीय संस्कृतीची नांदीच आहे असे समजले पाहिजे.
सध्याच्या राजकीय व्यवस्थेकडून आपल्या समस्येवर काही तोडगा वा उपाय मिळत नसल्याच्या अपरिहार्यतेतून या पर्यायाची निर्मिती झाली आहे. निवडणुका जिंकणे वा हरणे यापेक्षा आम्हीही या प्रक्रियेचे हकदार आहोत व सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या आपण कधीच निवडणुकांच्या राजकारणात प्रतिनिधित्व करू शकणार नाही या निराशेची कोंडी फोडणारे आहे. प्रतिनिधित्व तर जाऊ द्या आजवरच्या सा-या निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी त्यांना समाधानकारक वाटू शकेल असा पर्यायही कधी उपलब्ध नव्हता. सत्तेच्या खडकावर नैतिकतेचे डोके आपटून आत्मघात करून घेण्यापेक्षा घटनेचेच दिलेल्या संसदीय हत्याराचा वापर लोकशाहीतील अधिकार असलेल्या नागरिकांनी केला तर तो स्वीकाहार्य नसला तरी निंदनीय नक्कीच नसावा.
                                             डॉ. गिरधर पाटील. girdhar.patil@gmail.com  

Thursday, 4 October 2012

हाल शेतक-यांचेच,


व्यापारी झाले, आता माथाडी.........
आपला शेतमाल फक्त बाजार समित्यांमध्ये विकण्याचा एकमेव पर्याय असणा-या शेतक-यांमागचे शुक्लकाष्ठ संपत नाही की आपण संपवू देत नाही ?, असे विचारायची वेळ आलेली दिसते. कारण नुकतीच लालसगावच्या बाजार समितीतील जून्या व्यापा-यांनी नवीन व्यापा-यांना खरेदीची परवानगी नाकारण्याच्या हट्टापोटी दिलेली संपाची हाळी विरते न विरते तोच हमाल माथाड्यांनी काहीतरी कुरापत काढून बाजार समितीच्या कामकाजात अडथळा आणण्याची भूमिका घेतली दिसते. या सा-या प्रकारात शेतक-यांची काही भूमिका आहे व त्यामुळे व्यापारी वा माथाडींच्या प्रश्न सोडवण्यात त्याचा काही संबंध आहे, असे काहीही नसतांना त्यांचा शेतमाल विकण्याचा वैधानिक अधिकार डावलून त्यांच्या उपजिविकेच्या अधिकारावर गदा आणत, या प्रकारात पणन खाते, बाजार समित्यांचे व्यवस्थापन, व्यापारी, हमाल, मापारी, माथाडी या सा-यांनी शेतक-यालाच वेठीस धरल्याचे दिसते आहे.
एकादा मुलगा अतिलाडामुळे बहकला असेल तर पालकांचा दोष त्यांच्या पदरात टाकतांना त्याला काय वळण लावले हा प्रश्न ब-याचदा विचारला जातो. बाजार समितीतील व्यापारी काय वा हमाल मापारी काय हे सारे पणन खात्याच्या अतिलाडामुळे व संरक्षणामुळे, केवळ आमचा स्वार्थ, अशी भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण असणा-या सरकार नामक व्यवस्थेचा यात नेमका काय सहभाग आहे हे शोधण्याचीही वेळ आलेली दिसते. यात फरक येवढाच की पालक हे अज्ञानी वा हतबल असू शकतात, मात्र या प्रकरणात अशा लाडांची पुरेपुर किंमत वसूल करीत पणन खाते हे स्वतःला काही तोषिस लागू न देता शेतक-यांचा बळी देते असल्याचे लक्षात आले आहे.
यातील सरकारची कायदापालनाची जबाबदारी आहेच, ती का व कशी पाळली जात नाही याची वास्तव कारणे शोधली तर अंगावर काटे येतात. लासलगावच्या व्यापा-यांच्या संपाच्या वेळी या सा-यांची वैधानिक जबाबदारी ज्या जिल्हा उपनिबंधकांवर आहे त्यांच्याशी संपर्क साधला असता आपले कर्तव्य व शेतक-यांच्या हलाखीची कुठलीही मागमूस नसणा-या सरकारी थाटाचे, बाजार समित्यांना पत्र लिहिले आहे, असे उत्तर दिले. वास्तवात एकाद्या बाजार समितीत जेव्हा संपासारखी आणीबाणीच्या परिस्थितीची वेळ येते तेव्हा स्थानिक स्तरावरचे सारे सामोपचारी वा सनदशीर मार्ग संपल्यानेच वरच्या हस्तक्षेपाची खरी गरज असते. बाजार समितीचे व्यवस्थापन हे आव्हान पेलण्यास सक्षम नसेल तर त्यावर कायद्यात काय करावे याबद्दल स्पष्ट असे निर्णय आहेत, मात्र या मात्रेचा असर या सा-या तरतुदी वापरल्या तरच्या आहेत. या तरतुदी का वापरल्या जात नाहीत याची उत्तरे भयानक आहेत.
सध्याची भारतातील शेतमाल खरेदीची व्यवस्था ही शोषणाचे एक प्रमुख हत्यार असून त्यात समाविष्ट असलेले घटक हे राज्य पातळीवरच्या पणन खात्यावर अंकुश ठेऊन आहेत. व्यापारी तर सरळ सरळ आपली आर्थिक ताकद वापरत या खात्याला आपल्या ताब्यात ठेवतात तर माथाडींची ताकद राजकीय क्षेत्रात वापरत त्यांचा निवडणुकीच्या राजकारणात वापर केला जातो. यात राज्यातील ‘जाणता’ समजला जाणारा पक्ष आघाडीवर आहे. या माथाडींची दहशत एवढी आहे की वाशीसारख्या महाकाय बाजार समितीवर ते वर्चस्व ठेऊन असतांनाच गावोगावच्या बाजार समित्यांमध्ये बाजार समित्यांच्या व्यवस्थापन व व्यापा-यांच्या मनमानीला, पर्यायाने शेतक-यांच्या शोषण व्यवस्थेला बळकट करीत असतात. मुंबईतल्या ग्राहकांना स्वस्त व ताजा भाजीपाला न मिळू देण्यात या माथाड्यांचाच हात आहे व स्वस्तात माल घेणारे दलाल या माथाड्यांचा त्यासाठी वापर करून घेतात. बाजार समित्यांमध्ये ज्या ज्या वेळी शेतक-यांचे अन्यायाविरोधात उठाव झाले त्या त्या वेळी शेतक-यांवर प्राणघातक हल्ले करण्यात कोण पुढे होते याची माहिती घेतल्यास याचा उलगडा होऊ शकेल.
सर्वसाधारणपणे हमालीचे काम करणा-या घटकांबद्दल एक प्रकारची कणव असते. कारण हे काम तसे कष्टाचे व समाधानकारक मोबदला न देणारे मानले जाते. साहेब, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका ही विनंती तशी प्रसिध्द असली तरी बाजार समितीतील हमालांना ही गरीबीची परिमाणे लागू होत नाहीत. ब-याचशा बाजार समित्यांमध्ये शेतक-यांना व्याजाने पैसे देण्याचा या माथाड्यांचा प्रमुख धंदा आहे. आज बाजार समितीत हमालीचा परवाना मिळवायचा असेल तर पणन खाते, बाजार समिती व्यवस्थापन व माथाड्यांच्या संघटनेला लाखो रूपये द्यावे लागतात. हा परवाना मिळाल्यानंतर परवानाधारक बाजार समितीत प्रत्यक्ष काम न करता खरोखरच्या हमालाला रोजंदारीने कामाला लावतो. व दिवसाकाठी बाजार समितीतल्या आपल्या वाट्याच्या हमालीतून शेसव्वाशे रूपये देऊन रोज दोनतीन हजार रूपये कमावतो. हे आकडे बाजार समितीच्या उलाढालीनुसार बदलू शकतात. आता यांना हमाल या व्यवसायाचे काय परिमाण लावायचे हे ठरवता येईल.
या हमालाच्या दहशतीमुळे काय काय प्रकार बाजार समित्यांमध्ये वाढीस लागले आहेत, त्यात प्रत्यक्ष हमालीची सेवा दिली नाही तरी बाजार समितीत आलेल्या सर्व मालावर हमाली लागलीच पाहिजे ही सक्ती. यावर न्यायालयाने, नो वर्क नो वेजेस, असा निकाल देऊनही हा निकाल राबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक बाजार पेठांत कांद्यासारखा शेतमाल हा ट्रॅक्टरट्रॉलीतून आणला जातो व बाजार समितीच्या आवाराबाहेरच्या काट्यावर वजन करून त्याचा लिलाव होतो. यात कुठलीही हमाली वा मापाई होत नसतांना देखील ती आकारली जाते, ती कोणीही दिली तरी तिचा भार शेतक-यावरच पडतो व शेतमाल महाग होण्यातही तिचा सहभाग ठरतो.
ब-याचशा बाजार समित्यांच्या कामकाजात येवढ्या पटींनी वाढ झालेली आहे की त्यांत सा-याच घटकांची संख्यात्मक वाढ होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ लासलगावच्या बाजार समितीचा कारभार ज्यावेळी बाल्यावस्थेत होता त्यावेळच्या व्यापा-यांची संख्या होती २००. त्यातील काही नैसर्गिक कारणांनी कमी होत आज फक्त १२५ व्यापारी उरले आहेत. आता या बाजार पेठेचा व्यवहार अनेक पटींनी वाढला असला तरी नव्या व्यापा-यांना यात व्यापार करण्याची संधी मिळत नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जून्या व्यापा-यांच्या संघटनेने दिल्हा पातळीवर नव्या व्यापा-यांना परवाने देण्यात येऊ नयेत असा फतवाच काढला आहे व पणन खात्यासह सा-या बाजार समित्या तो शिरसावंद्य मानून त्याचे पालन करीत असतात. या नव्या खरेदीदारात अनेक निर्यातदार व प्रक्रिया उद्योजक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच हमालाच्या बाबतही झाले आहे. बाजार समित्यांत वाढलेल्या कामकाजानुसार हमालांची संख्या न वाढल्याने अनेक बेरोजगार कंत्राटी हमाल म्हणून परवानाधारक हमालांकडे काम करताहेत, त्यांचे काय शोषण होते हा वेगळाच विषय आहे. खरे म्हणजे खुलीकरण स्विकारलेल्या देशात अजूनही परवान्याच्या पध्दती कार्यरत आहेत. शेतक-यांचे बाजार स्वातंत्र्य हिरावणा-या या व्यवस्थेत शेतक-याला आपला व्यापारी निवडण्याचे, आपला हमाल निवडण्याचे स्वातंत्र्य नाही कारण त्याला हे सारे उपलब्ध करून देणारे शासनावर पगारपाण्याचा बोजा बनून राहिलेले पणन खाते, बाजार समित्या, ज्या राजाकारणाचे अड्डे झाल्या आहेत त्यांना पोसण्याचीही जबाबदारीही सा-या जगाचे पोट भरणा-या शेतक-यांनेच घ्यावी असेच सा-यांना अभिप्रेत असल्याने आपले हे अरण्यरूदन चालू द्यावे हेच बरीक खरे.             डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com