भारतीय
राजकारणातील पक्षीय घटक हा घटना वा संसदेइतकाच अपरिहार्य वाटण्याइतपत आपल्या
राजकीय व्यवस्थेत ओतप्रोत भिनला आहे. कुठलेही राजकीय भाष्य वा विश्लेषण हे पक्षीय
नजरेतूनच गाळले गेले पाहिजे अन्यथा ते राजकीय नाही असेही मानले जाते. भारतातील पक्षीय
राजकारण व वास्तव यातली तफावत होतीच, मात्र सत्तेच्या वाटमारीत ती दखलपात्र ठरत
नव्हती. तीची स्पष्ट दखल मागच्या लोकसभेच्या निकालावरून जनतेने घेतल्याचे दिसत
असले तरी राजकारणी व सर्वसाधारण माध्यमे अजून शहामृगी पवित्रा घेत आपल्या पठडीबंद
राजकारणाची घडी विस्कटू द्यायला तयार नाहीत.
सा-या
राजकीय पक्षांची सत्तेबाबतची काही समीकरणे असतात, त्याचबरोबर जनता वा मतदारांबाबत काही
कल्पना असतात. त्यांना कसे हाताळले म्हणजे आपण सत्तेवर येऊ अशी रणनिती आखली जाते.
यातून जनतेच्या मनातसुध्दा राजकीय पक्षांबाबत एक प्रतिमा तयार होत असते. पूर्वी या
पक्षीय प्रतिमा पक्षाची धोरणे, तत्वज्ञान वा नेतृत्वाच्या क्षमता यावरून केल्या
जात. मात्र गेल्याकाही काळापासून भारतीय राजकारणातील घडामोडींनी या प्रतिमांचा भंग
होत पक्षांतील वेगळेपण नाहीसे होत केवळ सत्ताप्राप्ती व त्यातून साधण्यात येणारा
स्वार्थ स्पष्ट होत गेल्याने भारतीय मतदाराची मानसिकता ही पक्ष सापेक्षतेपेक्षा
स्वतःचे भवितव्य, सुरक्षितता व हित याच्याशी जुळत गेल्याचे दिसते. यात मुख्यत्वे
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पक्षाभिनिवेशापेक्षा माझ्या स्वतंत्र मतदानाच्या
अधिकाराची बूज राखणे हा घटक मतदारांच्या दृष्टीने महत्वाचा ठरत असून पूर्वी जसे,
हा पक्ष की तो, अशी निवड न रहाता, मी या
व्यवस्थेतील एक घटक म्हणून, सारी राजकीय व्यवस्था एकीकडे व माझी स्वतःची मते
एकीकडे, असे ध्रृवीकरण होत असल्याचे दिसते. याला मदतीला आलेले माहिती तंत्रज्ञान,
स्पर्धात्मक माध्यमे, सोशल मिडियासारखी सर्वसमावेशक व्यासपीठे यांचाही सहभाग
महत्वाचा आहेच. यातून सा-या राजकीय पक्षांना एकाच पारड्यात तोलणारा मतदार उदयास
आला आहे. तो सध्याच्या राजकारणात निर्णायक ठरतोय. त्याची दखल कशी घ्यावी हे आज
खुज्या ठरलेल्या राजकीय पक्षांपुढे आव्हान आहे. यातला महत्वाचा भाग असा की राजकीय
पक्ष आजवर जो जनाधार आपल्याबाजूने असल्याचे गृहित धरत त्याबद्दलच अनिश्चितता
आल्याने या सा-यांच्या जिंकून यायच्या शक्यताही धूसर होऊ लागल्या आहेत.
मागच्या
निवडणुकीत मोदींचा उपलब्ध पर्याय व जोडीला सा-या राजकीय व्यवस्थेविरोधातील तीव्र
प्रतिक्रिया यातून प्रस्थापितांना हादरे बसावेत असे निकाल आले. यात मोदी नावाचा एक
नवा फिनॉमिना, ज्याला पक्ष म्हणून नव्हे तर एक नवे आशास्थान म्हणून मतदारांनी
निवडलेले दिसते. किंबहुना स्वतः मोदींनी पक्षनिरपेक्ष असा आपला स्वतःचा एक वेगळा
ठसा सा-या प्रचारातून उमटवला, पक्षाचा फारसा उल्लेख न करता सरळ जनतेशी संवाद साधत आपणा
सा-यांच्या एक नागरिक म्हणून काय जबाबदा-या आहेत याचे भान आणून देत मतदारांना
आश्वासक व सहभागी वाटेल असे वातावरण तयार झाले. केवळ जनताच नव्हे तर सा-या राजकीय
व्यवस्थेला, ज्यात विरोधकही आले, एकत्र करत विधायक सामूहिकतेचा मंत्र दिला. आपण
सारे सव्वाशे कोटी, त्यातील तरूणांची संख्या, त्यांच्या आशाआकांक्षा, तंत्रज्ञान,
त्यातून समृध्दी, यासारखी वाक्ये वापरत त्यांनी पक्षीय राजकारणाची,
जातीधर्माची, तात्कालिक अनुनयाची सारी हत्यारे बोथट केली व इतर सा-या
पक्षांना एवढे खुजे करून टाकले की अजूनही भानावर यायला त्यांना कठीण जाते आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या विविध पक्षांकडच्या एकमेव बातम्या म्हणजे जागावाटपाच्या
व दुसरीकडे स्वार्थी राजकारण्यांच्या पक्षांतराच्या, ज्यात सर्वसामान्यांना बिलकूल
स्वारस्य नाही. या जागावाटपाच्या सा-या चर्चांमागे पराभवाच्या भितीचा एक अदृश्य
धागा सतत वावरतांना दिसून येतो. होणारे पक्षांतरही हे भाकडच ठरणार हे माहित असूनही
त्याचे स्वप्नरंजन केले जाते.
दिल्लीत
आल्यापासूनचीच नव्हे तर आजवरची मोदींचे सारी राजकीय वाटचाल जर बघितली तर तिचे काही
खास वेगळेपण आहे. त्यांच्यावरचा संघपरिवाराचा व पक्ष म्हणून भाजपाचा प्रभाव लक्षात
घेऊनही त्यांनी हे वेगळेपण जपल्याचे लक्षात येते. काही प्रकरणात ते संघाच्याही
विरोधात खंबीरपणे गेल्याचे दिसते व भाजपातील त्यांना काय आवडत नाही हेही वेळच्यावेळी
त्यांनी दाखवून दिले आहे. हे करत असतांना त्याची किंमतही मोजण्याची त्यांची तयारी
दिसून आली आहे. आताही या चमत्काराचे वलय घेऊन वावरणा-या व निर्दयी (Ruthless)
राजकारण
करणा-या मोदींना आपल्या पध्दतीने राज्यकारभार करतांना विरोधकांपेक्षा स्वकियांशीच लढावे
लागणार आहे. आज मोदी काही नको असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या एका बसचे चालक आहेत.
त्यांचा अडथळा दूर करण्यासाठी येणा-या
प्रत्येक थांब्यावरच्या संधी घेत नकोसे असलेल्यांना उतरवत, नव्यांना संधी देत ते
आपली टीम तयार करतील. यात प्रामुख्याने अराजकीय अभ्यासक व तज्ञांचा भरणा असू शकेल.
राजकारणाच्या कार्पोटरायझेनची ती सुरुवात असेल. याचे परिणाम काय होतील हे येणारा
काळच ठरवणार असला तरी यापुढच्या राजकारणाच्या दिशा काय असणार आहेत हे समजून
घ्यायला त्याची मदत होऊ शकेल.
सध्याचे
पक्ष सुसंगत बदलाला सामोरे गेले नाहीत तर या पुढच्या काळात पक्षीय राजकारणाचे
भवितव्य मात्र काळजी करायला लावणारे ठरू शकेल. याचा अर्थ पक्षीय व्यवस्था लगेचच
नामशेष होईल असे मानण्याचे काही कारण नाही. मात्र सत्तासमीकरणात सौदेबाजी, तडजोडी करण्यासाठी
उपयोगी पडणारा पक्षीय ढाचा मोदींना मिळालेल्या बहुमताची ताकद लक्षात घेता
देशपातळीवर फारसा आवश्यक ठरणार नाही. राज्य पातळीवर इतर पक्षांचे राज्य आले तरी
त्यांच्या पक्षीय ताकदीचा केंद्रावर फारसा परिणाम होणार नाही. आणि आपल्या ताकदीवर
केंद्राला नमवण्याची शक्यताच संपल्यानंतर त्यांनाही केंद्राशी विरोधापेक्षा जमवून
घेणेच फायद्याचे ठरेल. विशेष म्हणजे या पर्यायी मार्गाचे फायदे जर सध्याच्या पक्षीय
व्यवस्थेपेक्षा परिणामकारक वाटले तरी इतर पक्षांनाही आपल्या राजकारणाची दिशा बदलवत
नव्याने विचार करावा लागेल.
एकंदरीत
भारतीय राजकारण साधारणतः कुठल्या दिशेने जाईल याचा हा अल्पसा आढावा आहे. आजवरच्या
आपल्या भ्रामक प्रतिमांमध्ये आत्ममग्न असणा-या पक्षांना मतदारांमध्ये काय चालले
आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजपाला मोदींच्या नावाचा पासवर्ड व नुकताच
लागलेला लोकसभेचा निकाल कळीचा आधार वाटतो. शिवसेना आपल्याच मस्तीत चूर आहे.
राष्ट्रवादी येणा-या झंजावातात कसे टिकून रहायचे या चिंतेत आहे. महाराष्ट्र
शासनाच्या आपल्या कार्यक्रमांच्या जाहिराती वास्तवतेपासून किती दूर गेल्यात हे
बघितल्यावर ज्या बातम्यांच्या मध्ये या जाहिराती दिल्या जातात, त्यातली बातमी व
जाहिरात यातील विरोधाभास प्रकर्षाने दिसतो व या जाहिरातीही फोल असल्याचे लगेचच
लक्षात येते. आज या सा-या जाहिराती या चेष्टेचा विषय झाल्या असून एवढी वर्षे सत्ता
गाजवणा-या काँग्रेसची जर ही अवस्था असेल तर इतरांचे काही विचारायलाच नको. एकीकडे
निवडणुकीत सामोरे जायला काही मुद्दे नाहीत, कार्यक्रम तर अगोदरच ढासळलेले, फुकट
देऊन द्यायच्या वस्तुही संपल्या व तशा त्या आताशा देताही येत नाही, मतदारांवर
जातीधर्माचा पगडा नसल्याचे गेल्या निवडणुकीतच सिध्द झाले, मतदारांना पैसे, दारू
वाटावी तरी मते आपल्यालाच मिळतील याची खात्री नाही अशा कचाट्यात आपले परंपरागत
पक्ष सापडले आहेत. यातून आता कसे बाहेर पडायचे हा सर्वांपुढे पडलेला ‘क्रायसिस’ आहे.
डॉ. गिरधर
पाटील. Girdhar.patil@gmail.com
No comments:
Post a Comment