Friday, 19 April 2013

चित्रकार ते सामाजिक कार्यकर्ता


उंबरठा स्वप्निल जीवनाचा
दै. लोकमतचा या भन्नाट कल्पनेवर लेख मागण्याचा फोन जेव्हा आला तेव्हा खरे म्हणजे मी उडालोच. आपला भूतकाळ तशी आपली नेहमीच पाठराखण करीत असला तरी पंधरा ते सतरा या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणा-या वयातील आपल्या तेव्हाच्या कल्पना आणि आजच्या वास्तवातले आपण यात नेमके काय काय घडत गेले याचा मागोवा हा नुसता स्मृतींना उजाळा देण्याचा प्रकार नसून आपण व आपले जीवन यातले नेमके काय नाते आहे व आपण आपल्या जीवनाला कितपत बांधील वा जबाबदार आहोत हे स्पष्ट करणारा आलेख आहे हेही लक्षात यायला लागले. यातला मी हा कर्ता व आजवरचे सारे कर्म यांच्यातील कार्यकारण भावाचा परस्पर संबंध कसकसा आपल्याला घडवत गेला याचा एक नवीन चष्मा या निमित्ताने ल्यायला मिळाला हा त्यातला अधिकचा लाभ.
पंधरा ते सतरा हे वय साधारणतः आमच्या वेळच्या अकरावीचे. नुसती शाळा सोडून कॉलेजात जाण्याबरोबर एकंदरीत आपल्याला जीवनात काय मिळवायचे आहे वा काय व्हायचे आहे याविषयीचे निर्णय घेण्याचे. मध्यमवर्गीय कुटूंबात साधारणतः असे निर्णय हे उपजिविकेच्या निकडीशी जुळलेले असतात. आपल्याला काय आवडते यापेक्षा कुठे डिमांड जास्त आहे यावर असे निर्णय ठरत. कारण आर्टस्, कॉमर्स वा सायन्सला जाऊन पदवीधर व्हायचे वा आयटीआयसारखे कोर्सेस करून पोटापाण्याला लागायचे याचेही निर्णय याच उंबरठ्यावर घ्यावे लागत. साधारणतः शिकलेल्या घरांतून आलेल्या पाहु्ण्यांनी, मोठा झाल्यावर कोण होणार, या विचारलेल्या प्रश्नाला, मी डागतर व्हणार नायतर एंजिनेर होणार, या उत्तराने निदान त्यावेळी तरी सा-यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असे. नट किंवा कलाकार होणार असे सांगण्याची प्रथा नव्हती कारण त्यासाठी काही करावे लागते ते नेमके काय असते हे माहीत नसल्याने त्या प्रातांत कुणी शिरत नसे. राजकारणी होणार म्हणण्याइतपत राजकारण सर्वसामान्यांच्या जीवनात घुसले नव्हते. गांधी, नेहरू वा एकंदरीत माहीत झालेला स्वातंत्र्य लढा हा राजकारणाला करियरच्या पातळीवर आणण्याइतपत फायदेशीर न वाटल्याने कुणी त्या वाटेला जात नसे.
मला आठवते त्या वयात मी दहावी अकरावीला नंदुरबारच्या डी आर हायस्कूल मध्ये शिकायला होतो. वडील पोलिस खात्यात असल्याने सारख्या बदल्या होत असल्याने अगोदरचे शिक्षण अनेक गांवे फिरत फिरत झाले होते. सुदैवाने हायस्कूलचे म्हणजे आठवी ते अकरावी हे नंदुरबार या एकाच गावात व शाळेत झाल्याने काहीशा स्थिरतेमुळे मला अनेक गोष्टी करता आल्या. नंदुरबार हे गांव व त्यातली ही शाळा या दोहोंनी माझ्या जीवनावर अनेक दिशांनी परिणाम करत मला घडवले आहे. नंदुरबार हे गाव ज्यांना माहिती आहे त्यांना या गावाच्या पिंडाची कल्पना आहे. आर्थिक दृष्ट्या परिसरातील बाजाराचे महत्वाचे गाव सांस्कृतिक क्षेत्रात तेवढेच नावाजलेले होते. या शाळेतील एनवायपीवाय जोशी हे बंधुद्वय, राव सर, चित्रकार पाटीलसर, बेहेरे मॅडम, यार्दी सर हे सारे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज होते. मराठे नावाचे सर क्रांतीकारकांच्या लढ्याचे उतारे वाचून दाखवत त्यावेळचे अंगावर उभे रहाणारे शहारे अजून मला आठवतात. माझ्या दृष्टीने या सा-या कालखंडात मला लागलेली वाचनाची सवय व त्याला पूरक ठरणारी नंदुरबारची सारी वाचनालये यांचा एक मोठा परिणाम माझ्या जीवनावर झाला आहे असे मला वाटते. त्याकाळी व त्या वयात नंदुरबारमधली सारी वाचनालये बाबूराव अर्नाळकरांसह पालथी घालत वाचून काढली होती.
खरे म्हणजे जीवनात कोणीतरी व्हावे असे वाटण्याची वेळच माझ्या जीवनात मला कधी प्रकर्षाने जाणवली नाही. तशा दृष्टीने काही आखणी वा नियोजन केल्याचेही आठवत नाही. खेळात जेमतेमच असल्याने त्या प्रांतातले फारसे गम्य नव्हते. चित्रकलेत ब-यापैकी हात होता व त्यात बरीचशी मजलही मारली होती. नंदुरबारला एक नावाजलेले चित्रकार होते व सा-या मोठ्या दुकानावरच्या फलकांवर त्यांनी काढलेली चित्रे असत व या सा-या चित्रांखाली सोमवंशी ही त्यांची लफ्तेदार सही असे. एक करियर म्हणून नव्हे तर हौस म्हणून मी तैलचित्रे काढू लागलो व त्याकाळी नंदुरबारमधील अनेक दुकांनावर मी काढलेली चित्रे झळकू लागली व त्याखाली माझी गिरधर या नावाची लफ्तेदार सहीही दिसू लागली. मात्र या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहण्याचे गांभिर्यच आले नाही व अकरावी पास झाल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी शहरात म्हणजे धुळ्याला यायचे ठरल्याने वडीलांनीही धुळ्याला बदली मागून घेतली व आम्ही सारे धुळ्याला आलो.
धुळ्यात आल्यानंतर माझे अकरावीचे मार्क (गणितात मी १०० पैकी ९० गुण मिळवून शाळेत पहिला होतो) बघून वडिलांच्या स्नेह्याने सायन्सला प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे काहीतरी आखणी करून काहीतरी कुणीतरी व्हायचा प्रयत्न नसल्याचेच परत एकदा सिध्द झाले. प्रथम वर्षही असेच गेले. एफ वायला ए किंवा बी ग्रुप निवडून इंजिनिअरिंग वा मेडिकलला जायचे असते याचा शोध लागल्याने गणितापेक्षा बॉयॉलॉजी बरी म्हणून बी ग्रुप घेतला व मेडिकलला जाण्याचा फारसा गंभीर नसलेला निर्णय घेतल्याचे आठवते. मात्र वैद्यकीय शाखेला लागणा-या गुणवत्तेची जसजशी कल्पना यायला लागली तसतसा आत्मविश्वास ढासळायला लागला. मेडिकललाच जायचे असेल तर चांगले कॉलेज निवडून सुरूवातीपासून चांगला अभ्यास करण्याचा विचार करत त्यावर्षी ड्रॉप घेण्याचाही निर्णय झाला. पुण्याच्या त्यावेळच्या एमईएस कॉलेजात प्रवेश घेतला व मेडिकलला जाण्याची इच्छा काहीशी अधोरेखित झाली. मात्र पुण्याच्या वास्तव्यात सामाजिक वा सामूहिक सहभागाची बीजे रोवली गेली व जीवनाचा पट यापेक्षाही व्यापक करता येईल का याची नकळतपणे का होईना चाचपणी सुरू झाल्याचे वाटते.
पुढे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करीत असतांनाच लेखनाची संधी मिळाली व ते बघून त्यावेळचे संपादक अनंत पाटील यांनी लिहित राहण्याचा सल्ला दिला. त्याच दरम्यान एसेम जोशींशी काही आंदोलनांच्या निमित्ताने संबंध आला व सामाजिक बांधिलकीचे व सहभागाचे काही प्राथमिक धडेही मिळाले. आज ज्याच्याशी तुलना केली जाते त्या ७२च्या दुष्काळात आम्ही आमच्या मंडळातर्फे ज्याचा मी अध्यक्ष होतो, चंद्रशेखर गाडगीळांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करून मुख्यमंत्री निधीला घवघवीत मदतही केली होती. अर्थात या सा-याचा रोख काही तरी होण्यासाठी वा मिळवण्यासाठी होता असे म्हणता येणार नाही.
वैद्यकीय व्यवसायातही आपल्या भौतिक गरजा पूर्ण होत असल्याचा आत्मविश्वास जाणवताच स्वतःच्या मूळ उर्मींना न्याय देण्याचा प्रयत्न उफाळून यायचा. घरच्यांना हे भिकेचे डोहाळे वाटत व धंद्याकडे लक्ष नाही येथपासून ते आता पोट भरल्याने गरज राहीली नाही या टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र या दोघांमध्ये संतुलन राखत भौतिक गरजांना न्याय देत मी ज्या व्यवस्थेत रहातो, तिचे काही तरी देणे लागतो, व ती परतफेड करण्याचा प्रयत्न मी करत राहीन या भावनेने आजवरचा प्रवास सुरू आहे. अगदी करियरवादी व्यावसाईकांनाही सांगू ईच्छितो की हे सारे करून देखील मी, माझे घर, माझी मुले अत्यंत समाधानकारक अवस्थेत आहेत दोन्ही मुले सॉफ्टवेअर मध्ये परदेशातून शिक्षण घेऊन मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. आजच्या परिमाणानुसार घरदार, गाडी, सारे असले तरी ती काही माझी ख-या समाधानाची कारणे नव्हेत. या व्यवस्थेत आवश्यक असणा-या परिवर्तनासाठी माझा खारीचा वाटा मी देऊ शकलो हीच माझ्या दृष्टीने ख-या समाधानाची बाब आहे.
                                          डॉ. गिरधर पाटील Girdhar.patil@gmail.com

No comments:

Post a Comment