आता आमचे कसे व काय होणार ?
सांप्रत देशात
आज राज्य, धर्म, जनहित इत्यादि गोष्टींच्या संबंधाने जो काही व्यवहार चालला आहे,
त्यात काहीतरी बदल व्हावा, व काहीतरी नवे अस्तित्वात यावे असे अलिकडे पुष्कळांस
वाटू लागले आहे. त्याचा स्थलावकाशाप्रमाणे विचार झाला पाहिजे व तो करू
लागण्यापूर्वी एक गोष्ट करणे फार जरूरीचे आहे ती ही कीं, सामाजिक सुधारणेच्या ज्या
तत्वांच्या अनुरोधाने आम्ही येथे रूढ असलेल्या राजकीय व धार्मिक, सामाजिक व
शैक्षणिक संस्थात फेरफार करावा, त्यापैकी काही मुळीच नाहीशा करून त्याठिकाणी
नवीनांची स्थापना करावी, असे म्हणणार, ती तत्वे कोणती हे अगदी थोडक्यात का होईना
सांगितले पाहिजे, त्याशिवाय ते कां करायचे हे नीट समजणार नाही. आज ज्या कित्येक
राजकीय व सामाजिक गोष्टींविषयी आमच्या लोकांत विशेष मतांतर दिसत आहे, कोणत्याही
प्रयत्नाने त्याचे आकलन झाले तर या देशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक असणा-या बंधुभाव
व सामंजस्याची अपेक्षा करता येईल.
आज देशातील आहेरे घटकांच्या हाती सारी सूत्र गेल्याने नाहीरे घटकांची फार
पंचाईत झाली आहे. या शोषित व वंचित घटकांची जी काही दैन्यावस्था झाली आहे ती
देशाच्या एकंदरीत राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरणाला पोषक आहे असे मानता येणार
नाही. आम्हांस विशेष काळजी वाटते ती या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी
कृषिसंस्थेची. जगाचे पोट भरण्याची निरपेक्ष सेवा करणा-या या पोशिंद्या शेतकरी
वर्गाची हालत आत्महत्यांसारख्या गंभीर स्थितीत येऊन देखील देशातील इतर वर्गांना,
विशेषतः याची वैधानिक जबाबादारी असणा-या सरकारनामक व्यवस्थेलाही त्याची फारशी
क्षिती नसल्याचे दिसत आहे. एकतर या आहेरे व्यवस्थेकडे शेतीतून निर्माण झालेल्या
वरकडीची बचत एवढ्या प्रमाणात साचली आहे की त्यांना आता या वर्गाची गरज नसल्याचे
भासू लागले आहे. प्रसंगी परराष्ट्राकडून खाद्यान्न आयात करू परंतु देशात
अन्नधान्याची तूट भासू देणार नाही इतपत या व्यवस्थेने या क्षेत्राकडे दूर्लक्ष
केले आहे. जागतिक अन्नपरिस्थितीचे रहाटगाडगे हे सदां फिरत रहाणार व कोणत्या वेळी
काय होणार हे सांगवत नसल्याने देशातील निम्मी लोकसंख्या अशी वा-यावर सोडणे देश व
जनहिताचे नाही हे आम्हास याठिकाणी नमूद करावेसे वाटते.
आज सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांना कुठला अमरपट्टा लाभला आहे असे देशातील
राजकीय इतिहासावरून सांगता येत नाही. विशेषतः अगोदरच्या राज्यकर्त्यांच्या
नाकर्तेपणाची शिक्षा म्हणून त्यांना पायउतार व्हावे लागले असले तरी नव्या राजकीय
पर्यायाला आपल्या मुळातच नसलेल्या अद्वितिय शक्तीचा प्रत्यवाय यावा व आपण या
देशाला अलौकिक परिस्थिती प्राप्त करून देऊ असा भ्रम होऊ लागला आहे व त्या उन्मादात
जो एक अट्टाहासी आग्रह प्रकट होऊ लागला आहे तो देशातील सांमजस्य व एकोप्याला धडकी
भरवणारा आहे. भारतीय मतदार हा एकंदरीतच अनेक संस्कार, रूढी, परंपरा, अंधश्रध्दांचा
बळी ठरला आहे व सम्यक विचारांना आवश्यक असणारी बुध्दीप्रामाण्यता व वास्तवादी
वस्तुनिष्ठता नसतांना हे सारे दुष्टचक्र समजणे त्याच्या आवाक्या बाहेरचे आहे. आज
या सा-या धार्मिक व परंपरावादी रेटा लावणा-या ज्या शक्ती आहेत त्या मुळात सा-या
बहुजनांच्या पाठिंब्यावरच असल्याचे दिसते. आपणच आपली कबर खोदतोय हे बिचा-या भावूक
बहुजनांच्या लक्षात येत नाही. शिवसेना वा भाजपासारखे हिंदुत्ववादाचा उघड पुरस्कार
करणारे पक्ष हा केवळ बहुजनांच्या बळावरच अस्तित्वात असून ज्या दिवशी या बहुजनांचे
डोळे उघडतील त्या दिवशी आपले आर्थिक वा व्यावहारिक स्वातंत्र मिळाल्याची अनुभूती
या वर्गाला होऊ शकेल.
या शेतकरी संप्रदायाला अगदी चार्वाकापासून ते फुले शाहू ते आंबेडकरांपर्यंत या
समीकरणाची जाणीव करून दिली तरी या समाजातील कर्मकांडे, अंधश्रध्दा, देवदेवकी, कमी
न होता वाढतच चालली आहे. एकंदरीत त्यांच्या जीवनातील अनिश्चितता, निराशा व काही
तरी चांगले होईल याच्या मावळलेल्या शक्यता यामुळे हा वर्ग तसा कायम भ्रामक
सुरक्षिततेच्या शोधात असतो व असे केले म्हणजे आपली भरभराट होईल अशा खोट्या
स्वप्नांच्या आहारी जात असतो. आज वाढती उत्सवप्रियता, खोट्या व उसन्या उन्मादात
रमणे, कालबाह्य सणांमध्ये काल व उर्जा व्यय करणे, वाढती व्यसनाधीनता ही सारी
सामाजिक नैराश्याची चिन्हे असून आपण ज्या मार्गाने जात आहोत तो चूकला असल्याचे
संकेत देणारी आहेत. आज आहेरे वर्गाचे स्वार्थ निश्चित झाले असून त्यात कुठलाही बदल
म्हणजे आपल्या स्वार्थाला धोका अशी भावना तयार झाल्याने सा-या व्यवस्था व
प्रक्रियांवर आवाज उठवणारा वर्ग म्हणून या वर्गाचाच आवाज खरा व शेवटचा आहे असे
चित्र तयार होऊ लागले आहे. या विरोधात आवाज उठवणा-यांना डावे, साम्यवादी. समाजवादी
एवढेच नव्हे तर थेट राष्ट्रद्रोही ठरवत त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा केला
जात आहे.
आपल्या भावनिक जीवनातील प्रतिकांचा वापर राजकीय अस्मिता जोपासण्यात होऊ लागला
आहे. आपली जात, धर्मच नव्हे तर मातापिता ही प्रतिकेही सार्वजनिक करत त्यांच्याशी
आपल्या भावना जोडत त्यांच्या मनात बंधुभावाऐवजी द्वेष व तिरस्कार निर्माण केला जात
आहे. आजवर ज्या भौगोलिक प्रदेशाच्या सीमा कधीच निश्चित नव्हत्या त्या प्रदेशाला
मातेची उपमा देत ती सर्वांवर लादली जात आहे. दोन भावांची वाटणी तशी आज जगन्मान्य
झाली आहे. त्यामुळे कोण्या भावाचे नुकसान झाले आहे असे दिसले नाही. उलट आर्थिक व
व्यवस्थापकीय सोईमुळे उन्नतीच झाल्याचे दिसते. एकाद्या मोठ्या उद्योगाचा कारभार
वाढला तर व्यवस्थापकीय कारणांसाठी अनेक लहान कंपन्यात विभाजन करणे हा आर्थिक व
व्यावहारिक शहाणपणा समजला जातो. अशा सर्वोपयोगी संकल्पनांना आईचे तुकडे करणे वा तत्सम
उपमा देणे हे आजच्या पिढीला संमत होत नसले तरी आपल्या निजी व राजकीय स्वार्थासाठी
जबरदस्तीने लादले जाते. प्रसंगी दंगाफसादही करून योग्य निर्णय करू दिले जात नाहीत
हे चित्र आज भारतीय सार्वजनिक जीवनाचे झाले आहे.
राष्ट्राला मातेची उपमा देण्यापेक्षा मानवी शरीराची दिली तर ती अधिक युक्त व
योग्य ठरावी. शरीरातील पेशी ज्याप्रमाणे आपणास नेमून दिलेले काम सरळपणे करीत
शरीराला बळ देत रहातात, तद् नुसार देशातल्या नागरिकांनी देशाहित लक्षात घेऊन आपले
वर्तन ठेवल्यास सा-यांचा उत्कर्षकाळ दूर नाही एवढेच या निमित्ताने !!
No comments:
Post a Comment