सण कसाही, केव्हाही आला तरी मोठा
असल्याने त्यात आनंदाला कधीच तोटा नसतो असे आपल्याकडे मानण्याची पध्दत आहे. मग ऐपत
नसली तरी इतरांना दाखवण्यासाठी का होईना ऋण काढून सण साजरा करायची वेळ येते. सणाला
काढलेले ऋण हे या किंवा पुढच्या हंगामात निश्चित फेडता येईल याची कुठलाही शाश्वती
नसतांना केवळ काळ्या आईच्या भरवशावर सारा शेतकरी समाज एकेक वर्ष पुढे ढकलत असतो. खरे
म्हणजे शेतक-यांनी ठरवले तर तो बारोमास दिवाळी साजरी करू शकतो कारण या विश्वात
उत्पादन केवळ त्याच्याच उद्योगात होते तेही सा-या जगाच्या मूलभूत गरजांपैकी भूक या
महत्वाच्या गरजेशी निगडीत आहे. सर्व जगाची सत्ता नियंत्रित करू शकणा-या या
शेतक-याची शक्तीस्थळे एवढी प्रबळ असतांना त्याच्यावर जगणेच मुष्कील होऊन आत्महत्या
करण्याची पाळी याचाही गंभीर विचार दुसरेतिसरे कोणी करणार नसून या समाजातील जाणकार
मंडळींनाच करावा लागणार आहे.
दुर्दैवाने आज गावात ज्यांना आपण
जाणकार समजतो ते एकतर या व्यवस्थेला शरण जात हतबल झालेले दिसतात. यात सामूहिक
हितापेक्षा व्यक्तीगत लाभाचाच विचार असतो. सत्तेचे लाभ पदरात पाडत काही चाणाक्ष
मंडळी सा-या गावाला वेठीस धरत असतात. बाहेरच्या राजकारणाला बळी पडत सा-या गावातील
वातावरण गढूळ करीत गाव म्हणून एकसंघ वा एकविचाराचा समूह ही संकल्पनाच मोडीत निघाली
आहे. समजदार वर्ग असा अडकलेला तर तरूणांना योग्य दिशा देणारे नेतृत्व नाही. जे
समोर येईल त्याला राजकारण म्हणत वहावत जायचे व कुणाच्या तरी हाताचे बाहुले होत, की
जय वा झिंदाबादच्या घोषणा देत स्वतःला कृतकृत्य मानून घ्यायची वेळ आज या ग्रामीण
तरूणांपुढे आली आहे. त्यांचे आदर्शही प्रस्थापित व्यवस्थेतीलच असतात. त्यांच्या
विचार व प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेपेक्षा तो कोणाचा कोण यावरच सारे ठरत असते. अशा
स्वीकारलेल्या नेतृत्वाकडून शेतक-यांचे ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्ष का सोडवले जात
नाही वा त्यांच्या कडून अशी अपेक्षाही केली जात नाही यातच सारे आले. प्रस्थापितांची
एवढी पकड या व्यवस्थेवर आहे की कुठलाही नवा विचार वा परिवर्तनाच्या शक्यता दिसू
लागताच त्याला नामोहरण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले जातात, प्रसंगी
दहशतीचा वापर होत नसल्याने नव्या विचारांचे अस्तित्वच ग्रामीण भागात धोक्यात आले
आहे. ज्यांनी नवा विचार सामूहिक पातळीवर स्वीकारता आला नसला तरी वैक्तीगत पातळीवर
स्वीकारल्याने अशी परिवर्तनाची वा विकासाची बेटे ग्रामीण भागात दिसतात. निदान
त्यांचा आदर्श घेत आपणही त्या दिशेने जावे असे सर्वसामान्य समाजाला का वाटत नाही
हा समाजशास्त्रिय प्रश्न अभ्यासावा लागणार आहे.
आज शेतीच्या प्रश्नांचे जे काही
कडबोळे झाले आहे ते प्रामुख्याने राजकीय व आर्थिक स्वरूपाचे आहे. शेतक-यांच्या
सामाजिक जीवनातील जातपात निवडणुक काळात अडचणीची ठरत असली तरी घराणेशाही हाही मोठा
रोग ग्रामीण राजकारणाला लागला आहे. या सा-या समस्यांचा उहापोह प्रामुख्याने राजकीय
व आर्थिक दृष्टीकोनातून केला तर त्याची उकल होऊ शकेल, मात्र त्यासाठी वास्तविकता,
वस्तुनिष्ठता, व्यापकता व बंडखोर प्रवृत्ती असेल तरच सध्याच्या व्यवस्थेच्या
मगरमिठीतून बाहेर पडता येईल. यासाठी शेतक-यांच्या तरूण मुलामुलींचा वर्ग आदर्श
असून निदान या वर्गानी एकत्र येत गाव पातळीवर आपल्या प्रश्नांचा अभ्यास व चर्चा
सुरू केल्या तर या दिशेने जाण्याचा स्तुत्य प्रयत्न ठरू शकेल. आपण आजवर या सदरातून
केलेल्या सा-या चर्चांना तरूण शेतक-यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सा-यांच्या
मनात काहीतरी करावे वा काहीतरी व्हावे असे प्रकर्षाने वाटत असते. मात्र त्याची
सुरूवात कशी व कुठे करावी हे होत नसल्याने अडकल्यासारखे वाटते आहे. हे सारे कसे
करता येईल याचे विवेचन पुढच्या बुधवारी !!
डॉ. गिरधर पाटील
९४२२२६३६८९