Friday 12 October 2012

चष्मा नव्हे, दृष्टीही बदला !!


चष्मा नव्हे, दृष्टीही बदला !!
जंतर मंतरवरील उपोषणाची सांगता शेवटी राजकीय पर्याय देण्याच्या निर्णयात झाली. या शक्यतेचे सूतोवाच दै. लोकसत्तातील २० जूलैच्या भ्रष्टाचारा विरोधात लढणा-यांनी आपल्या त्रुटी ओळखाव्यात या लेखात व्यक्त करतांनाच या पर्यायातील काठिण्य, धोके व कमतरता यांचाही उल्लेख केला होता. त्यावरील मुद्यांचा आज होणा-या सा-या चर्चांमध्ये समावेश होत असला तरी या निर्णयावर टीका करतांना वा स्वागत करतांना आपल्या पारंपारिक वैचारिक चौकटीचाच आधार घेतला जात असल्याने या नव्या वाटेवर नेमके काय वाढून ठेवले आहे याचा परामर्ष घेण्यात अडथळे येतील हे मात्र नक्की.
आजही ही सारी चर्चा अण्णांभोवतीच गिरवतांना अण्णा टीम, अण्णा राजकारणात येणार, अण्णा पक्ष काढणार, अशा अण्णाकेंद्रित मुद्यावरच एकवटते आहे. त्याचबरोबर राजकारणात येणे म्हणजे काहीतरी महाभयंकर महापातक आहे असाही सूर लागला आहे. राजकारण हे राजकारण असते व ते चांगले की वाईट हे तुम्ही कुठे आहात यावर ठरते. लोकशाहीत तर ते आवश्यक वा अनावश्यक याच्या चर्चाही फोल ठरतात. याबाबतच्या व्यक्त होत असलेल्या काही भूमिका या पटल्याने उस्फूर्त असतात तर काही भूमिका पटत नसूनही काही अपरिहार्य कारणांमुळे घ्याव्या लागलेल्या दिसतात. आजच्या भीषण व प्रत्यक्ष अनुभवातील राजकारणाबद्दल फारशी तक्रार न करता येऊ पहाणा-या शक्यतांबद्दल एवढा कोलाहल मात्र अनाकलनीय वाटतो. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा एकांगी व निश्चित झाल्याने अशा झापडबंद प्रतिक्रिया येत असतात.
या सा-या चर्चांमध्ये प्रामुख्याने अण्णांच्या आजवरच्या वाटचालीचा लेखाजोखा, त्यांच्या क्षमता वा मर्यादा यावर या नव्या पर्यायाचे भवितव्य वर्तवले जात आहे. हे आंदोलन येथपर्यंत येण्यात अण्णांचा वाटा, सहभाग वा अधिकार कोणीही नाकारणार नाही, परंतु या व्यतिरिक्तही या आंदोलनाच्या बाहेर न आलेल्या काही बाजू आहेत, परिवर्तनाच्या दिशा व शक्यता याबाबतीत एक नवा पल्ला गाठलेला असतांना त्या नेमक्या काय आहेत त्यांच्याकडे या महत्वाच्या क्षणी दूर्लक्ष होते आहे असे वाटते.
अण्णांच्या महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी चळवळी बरोबर भारतात अनेक ठिकाणी भ्रष्टाचारा विरोधात लहान मोठी, व्यक्तीगत वा संस्थांत्मक पातळीवर आंदोलने, चळवळी, लढे चालू होते. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधाला ग्राम विकासाची जोड लाभल्याने व त्यांच्या साधेपणामुळे महाराष्ट्रभर ही चळवळ उभी राहिली. काही वेळा सैध्दांतिकरित्या वेगळे वाटत असून सुध्दा महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा व त्याबद्दलची त्यांची कळकळ, प्रामाणिकता बघून त्यांना पाठिंबा दिला आहे. आजही ब-याच लोकांना (त्यांच्या दृष्टीने) अण्णांच्या चूका दिसत असून देखील त्यांना जाहिर विरोध करावा वा ते अप्रिय वाटावेत असे घडत नाही. थोड्याफार याच पध्दतीने ठिकठिकाणी असे काम करणा-या कार्यकर्त्यांना आपल्या क्षमता, मर्यादा यांचे भान येत असतांनाच देशव्यापी आंदोलनाची गरज भासू लागली व सिनर्जीच्या तत्वानुसार आपल्या क्षमता-मर्यादा, गुणदोषांची सरमिसळ होऊन एक नवी ताकद निर्माण करण्याचा प्रवास व प्रयास आपण सर्वांनी पाहिला आहे.
या आंदोलनात सक्रिय असलेली मंडळी प्रचलित अर्थाने राजकारणी म्हणून प्रसिध्द नसली तरी राजकारण नेमके कसे असावे याचा सांगोपांग विचार करून एक नव्या राजकीय संस्कृतीचा विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक नवी भाषा ते बोलू लागले आहेत. त्यांचे हेतुही सध्याच्या राजकारण्यांपेक्षा वाईट आहेत असे दिसलेले वा सिध्द झालेले नाही. त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे हा त्याच्यावरचा आरोप हास्यास्पद आहे. अशी महत्वाकांक्षा कशामुळे वाईट समजायची हे ते आरोप करणारेच जाणोत. निवडणुका केवळ आम्हीच जिंकू शकतो असा आत्मविश्वासी पवित्रा घेणा-या पक्षांना आपल्या या समजाचा पुर्नविचार करायला लावू शकेल अशी परिस्थिती आहे. नवा तरूण मतदार जो पाखंडीपणाच्या विरोधात असतो असा राजकीयच नव्हे तर अनेक पालकांचा स्वानुभव आहे. या पाखंडामुळेच एवढा मोठा वर्ग राजकारणापासून फटकून वागत असल्याचे दिसतो. हा सारा वर्ग या आंदोलनाच्या स्वच्छ व पारदर्शी विचारांना पाठींबा देत असल्याचे या आंदोलनात दिसून आले आहे. हेही या आंदोलनाचे यशच समजले पाहिजे. आपल्या पारंपारिक व्होट बँका वा अलोकशाही पध्दतीने मिळवलेल्या मतांचे प्रमाण या बदलत्या वातावरणात जेथे माहिती व विचाराचा भडिमाराने प्रसार करणारी प्रगत तंत्रज्ञानी माध्यमे व जनतेचा या सा-या व्यवस्थेप्रती असलेला स्वानुभव या नव्या परिमाणांमुळे बदलणार आहे हा या आंदोलनाने मिळवलेला मोठा टप्पा आहे.
देशपातळीवर या भ्रष्टाचाराच्या मुद्याला अग्रस्थानी नेऊन त्याला सर्वसामान्यांचे केवळ समर्थनच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील आपण या सर्वशक्तीमान व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपून उभे राहू शकतो या सक्षमीकरणापर्यंत या आंदोलनाने मजल गाठली आहे. एरवी यवतमाळसारख्या खेड्यातील एक शेतकरी महिला, येऊ दे त्या मंत्र्याला मग बघते असे जाहिररित्या बोलू शकली नसती. थोडक्यात एरवी आपल्याच मस्ती व गुर्मीत वावरणा-या या सत्ताधा-यांना कट टू साईज करण्याचे महत्वाचे काम या आंदोलनाने केले आहे. माहितीचा अधिकार व जनतेत येणारी ही जागरूकता ही गाव, तालुका वा जिल्हा पातळीवर सामान्यांच्या सहभागाने दिसू लागली आहे. लोक व्यवस्थेला प्रश्न करू लागले आहेत, माध्यमेही धीट होत एकापाठोपाठ भ्रष्टाचाराची महाकाय प्रकरणे काढू लागली आहेत. एकंदरीत सहभागी लोकशाहीच्या दिशेने पडणारे हे पाऊल आंदोलनाला अभिप्रेत असलेल्या नव्या राजकीय संस्कृतीची नांदीच आहे असे समजले पाहिजे.
सध्याच्या राजकीय व्यवस्थेकडून आपल्या समस्येवर काही तोडगा वा उपाय मिळत नसल्याच्या अपरिहार्यतेतून या पर्यायाची निर्मिती झाली आहे. निवडणुका जिंकणे वा हरणे यापेक्षा आम्हीही या प्रक्रियेचे हकदार आहोत व सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या आपण कधीच निवडणुकांच्या राजकारणात प्रतिनिधित्व करू शकणार नाही या निराशेची कोंडी फोडणारे आहे. प्रतिनिधित्व तर जाऊ द्या आजवरच्या सा-या निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी त्यांना समाधानकारक वाटू शकेल असा पर्यायही कधी उपलब्ध नव्हता. सत्तेच्या खडकावर नैतिकतेचे डोके आपटून आत्मघात करून घेण्यापेक्षा घटनेचेच दिलेल्या संसदीय हत्याराचा वापर लोकशाहीतील अधिकार असलेल्या नागरिकांनी केला तर तो स्वीकाहार्य नसला तरी निंदनीय नक्कीच नसावा.
                                             डॉ. गिरधर पाटील. girdhar.patil@gmail.com  

No comments:

Post a Comment